साखरीटोला (जि. गोंदिया) : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सालेकसा तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. असे असले; तरी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित बांधकाम विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
साखरीटोला-हेटीटोला या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्यावरून महिला, पुरुष, कर्मचारी, शाळकरी मुले ये-जा करीत असतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच शिवारीटोला ते डोमाटोला या रस्त्यावरूनदेखील नागरिकांचे आवागमन सुरू असते.
शिवारीटोला, पांढरवाणी, ठाकूरटोला, डोमाटोला, मरामजोब येथील नागरिकांकरिता हा मार्ग ये-जा करण्यासाठी सोयीस्कर आहे. परंतु, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने आणि गिट्टी वर आल्याने कधीही मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तुमडीटोला ते रुंगाटोला या रस्त्याचीदेखील अवस्था बिकट झाली आहे.
या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडून वर आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाच ते सहा महिने लोटूनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, एखादा मोठा अपघात घडल्यावर विभागाला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आमदारांनी विशेष लक्ष द्यावे
स्थानिक आमदारांनी विशेष लक्ष देऊन नागरिकांची रस्त्याची समस्या दूर करावी, अशी आपली मागणी आहे.
-देवराम चुटे, महामंत्री, भाजप युवा मोर्चा, सालेकसा.
रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच
साखरीटोला-हेटीटोला व शिवारीटोला -डोमाटोला, तुमडीटोला-रूंगाटोला तसेच आमगाव मतदारसंघातील सर्वच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू होईल. तसा प्रस्ताव कार्यकारी अभियंता गोंदिया यांना पाठविला आहे.
-सहसराम कोरोटे, आमदार
नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असलेल्या सालेकसा तालुक्याला शासनाकडून मोठा निधी येत असतो. मात्र, हा निधी विकासकामांवर खर्च होत असल्याचे दिसून येत नाही. परिणामी, आजही या तालुक्याचा विकास खुंटलाच आहे. याचे ज्वलंत उदाहरण रस्त्यांच्या दुरवस्थेवरून देता येईल. तथापि, विकासनिधी मुरतो तरी कुठे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.