अचलपूर : स्त्रीभ्रूणहत्येच्या दृष्टीने जिल्ह्यात कुठेही गर्भलिंग निदान होत असल्यास त्याबाबतची माहिती देणाऱ्यास शासनाने बक्षीस स्वरूपात दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ केली आहे. यापूर्वी शासनाकडून २५ हजारांचे बक्षीस दिले जात होते.
मात्र आता ती रक्कम वाढवून तब्बल एक लाख रुपये केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य यंत्रणेकडूनही जनजागृती केली जात आहे. दरम्यान माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवल्या जाणार आहे.
स्त्री भ्रूणहत्या ही संपूर्ण देशासमोरील मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सातत्याने नवनवीन उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार अमरावती जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर (एक हजार पुरुषांमागील स्त्रियांचे प्रमाण ९५१ असे होते, त्यानंतर २०२१ ची जनगणना केंद्र सरकारने अद्याप केली नसली तरी हे प्रमाण ९६१ पर्यंत वाढल्याची माहिती आहे.
याचाच अर्थ जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ३९ महिलांचे प्रमाण अद्याप कमी आहे. आजही अगदी सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या कुटुंबांमध्येही मुली नकोशा आहेत. त्यामुळे शहरी भागात उच्चभ्रू व सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या कुटुंबीयांकडूनही गर्भपात करून स्त्रीभ्रूणहत्या केली जात असल्याचे दिसून येते.
पैशांसाठी हपापलेले काही डॉक्टर या कुकर्मात सहभागी होतात. त्यामुळे अशा पालकांसह डॉक्टरांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याच्या अमलबजावणीसोबतच विविध जनजागृतीपर उपक्रमही राबविले जात आहेत.
त्याचाच भाग म्हणून शासनाकडून बक्षीस योजना राबविली जात आहे. त्यामध्ये दिले जाणारे बक्षीस आता एक लाख रुपयांचे करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल. मात्र सदर प्रकरणाची शहानिशा करून ते प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यावरच बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील महिला व पुरुषांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक असले तरी ते प्रमाण वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाचेही प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून शासनाकडून बक्षिसाची रक्कम आता एक लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे.
-डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.