shravan 
विदर्भ

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे !

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : " श्रावण मासी हर्ष मानसी
                               हिरवळ दाटे चोहीकडे
                              क्षणात येती सरसर शिरवे
                              क्षणात फिरुनी उन पडे "

बालकवींच्या या अजरामर ओळींनी प्रत्येकाचे बालपण आनंदघन झालेले आहे. श्रावणाची किमया जादुई शब्दांनी प्रत्येकाच्या मनात जणू अत्तरकुप्पी बनली आहे. खरेच निसर्गचक्र आणि भारतीय संस्कृतीच्या परंपरांची सुंदर गुंफण म्हणजे श्रावण !

वर्षा ऋतूतील श्रावण म्हणजे मनाला न्हाऊ घालणारा हिरवा मोरपिसारा. पाऊस सरींनी आसमंत हिरवागार झालेला. नद्या,ओहोळ ओसंडून वाहतात. आणि जलधारांनीमनावरचा ताण दूर होतो. हिरवाईचे गीत गाताना निसर्ग जणू ओथंबून येतो. क्षणात शिरवे अन्‌ क्षणात ऊन. हा जणू ऊन-पावसाचा अवखळ खेळ मनाला आतून सुखावून जातो.

" हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे "
कवीने श्रावणाचे केलेले हे वर्णन अगदी चपखल आहे. श्रावणाने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात अन्‌ कवींच्या प्रतिभेला बहर येतो, ते उगीचच नव्हे.

" हिरव्या चिंब पावलांनी
रम्य श्रावण बहरला
चैतन्य स्पंदनांनी
अणू- रेणूत मोहरला "
श्रावण सरींनी सारा निसर्ग अद्वितीय सौंदर्याने नटतो. रानावनातील गाई-गुरे, हिरव्या तृणांच्या मखमालीवर बागडणारी वासरे, हिरवी वनराई व त्यातून अविरत झरणारे शुभ्र निर्झर, तर आकाशी फुललेले सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सारे निसर्गाच्या कॅनव्हासवरील मोहक चित्र मनात साठवून ठेवताना प्रत्येक जण आनंदीत होतो.

गीतकार गुरु ठाकूर यांनी तर श्रावणाची 'हिरवी शाई' आपल्या सुंदर शब्दात व्यक्त केली.
" हिरवे छंद, हिरवी यमके
निवडून हिरवे वृत्त नेमके
हिरव्याकंच कविता आत
झरतील ठाई ठाई
लेखनीमध्ये भरून हिरवी शाई "

श्रावणात पाऊस सरींसोबत व्रतवैकल्यांनाही उधाण आलेले असते. खरे म्हणजे श्रावणात सणांची मस्त मैफल जमते. श्रावण सोमवारी भाविक शंकराची बेलपत्राने पूजाअर्चा करतात. निसर्गातील शंकराची रमणीय स्थाने भाविकांनी गजबजून जातात. नागपंचमी, रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी हे श्रावणातील महत्त्वाचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मंगळागौरीला मराठमोळा थाट सजुन येतो. नागपंचमीला श्रावण झुला प्रत्येक सुवासिनीच्या मनात आंदोलन घेतो. सण आणि व्रतवैकल्यांनी हिरवाई सोबत मन अधिकच हळवे बनते.

पुसद तालुक्‍याला निसर्गरम्य डोंगर-दऱ्या, जंगल, नदीनाले -ओहोळ यांचे वरदान लाभले आहे. वर्षा ऋतूत निसर्गातील चैतन्य साठवताना प्रत्येकजण मनातून हरखून जातो. पूस व पैनगंगा नदीकाठी असलेली शिवालये श्रावण सोमवारी भक्तीने फुलून येतात. यंदाच्या श्रावणाला कोरोनाची काळी किनार असली तरी श्रावणातील हिरव्यागार गालिच्यांची कमतरता मुळीच नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावणातील गीत मनावर हळूवार फुंकर घालत बेधुंद केल्याशिवाय राहत नाही. कवी मंगेश पाडगावकर यांचे लता मंगेशकर यांनी गायलेले गीत श्रावणाला अवचितपणे आलिंगन देते.
" श्रावणात घननिळा बरसला
रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतून अवचित
हिरवा मोरपिसारा "  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT