हिंगणा : परतीच्या पावसाने मागील दोन दिवसांपासून सुरुवात केल्याने खरीप पिकांवर याचा परिणाम होणार आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजतापासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हिंगणा तालुक्यात प्रामुख्याने कापूस व सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांना आवश्यक वेळी वरूणराजाने साथ दिल्याने कापूस व सोयाबीन पीक चांगले बहरले आहे. कापसाला आता बोंड येण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन पीक सवंगण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत पावसाचा दणका सुरू झाल्याने याचा परिणाम कापूस पिकावर होणार हे नक्की. पावसामुळे कापसाची बोंड काळपट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पावसाने अशीच हजेरी लावल्यास कापसाच्या उत्पादनात घट होऊन प्रतवारी घसरण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
सोयाबीन पीक सवंगण्याच्या मार्गावर आहे. पावसामुळे आता या पिकालाही जबर फटका बसण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. ज्वारीच्या पिकाचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी शेतात रात्रंदिवस राबत आहे. पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे ज्वारीची प्रतवारी घसरून बाजारभाव कमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरीप हंगाम यावर्षी चांगल्या स्थितीत होता. उत्तम पिके होती. यामुळे शेतकरी आनंदात होता. सप्टेंबर महिन्यांच्या २४ तारखेपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. २५ व २६ सप्टेंबर रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. यानंतर सायंकाळी पाच वाजतापासून पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. या पावसाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. निसर्गराजा दरवर्षी शेतकऱ्यावर नाराज होतो. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
शेतीपेक्षा नोकरी बरी
खरीप पिकांना दरवर्षी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. पिकासाठी लावलेला उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मायबाप सरकारकडून शेतकऱ्यांना तोकड्या स्वरूपात मदत केली जाते. दरवर्षी होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची मुलं आता शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहे. कंपनीत आठ तास काम करून मोलमजुरी करणे परवडते, अशी चर्चा शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये सुरू आहे. किमान महिनाभर काम केल्यानंतर पगार मिळेल, याची शाश्वती तरी या कंपनीच्या नोकरीत आहे. मात्र शेती व्यवसायात आता हमखास पीक होईल, अशी हमी मिळणे दुरापास्त झाले आहे.
उभी पिके झाली आडवी
द्रुगधामनाःदोन दिवसापासुन सुरू असलेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे. त्यामुळे उभी पिके आडवी झाली, तर काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. या परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
परतीच्या पावसामुळे कापूस, तूर या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला. दरम्यान तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.