एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषदची रस्ता निर्माण व दुरुस्ती योजनांचा करोडो रूपयांचा निधी कनिष्ठ दर्जाची कामे करून प्रशासनाच्या संगनमताने कंत्राटदाराच्या घशात टाकला जात असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे.
तालुक्यात शासनाच्या विविध योजना मार्फत 60 ते 70 कोटी रुपयांची रस्ता निर्माण व दुरुस्तीची कामे सन 2018-19 मध्ये करण्यात येत आहेत. यातील अनेक कामे अतिदुर्गम व नक्षल प्रभावी क्षेत्रातील असल्याने नक्षल्याच्या भीतीने कामाची देखभाल करण्यास कोणताही अधिकारी जाण्यास धजावत नाही. बरेच अधिकारी कार्यालयात बसून कंत्राटदाराच्या सांगण्यावरून कामाच्या प्रगतीचा अहवाल तयार करीत असतात. याच बाबीचा फायदा घेऊन कंत्राटदारांकडून कनिष्ठ दर्जाची कामे करण्यात येत असून बिले मंजूर करून घेतली जात असल्याच्या आरोप नागरिकांमधुन होतांना दिसुन येत आहे.
रस्ता निर्माण व दुरुस्ती कामे करतांना जेसीबी, पोकलँड व ट्रॅक्टर अशा यंत्रसामग्रीच्या वापराने कामे पूर्ण केली जात असतांना नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिकांना रोजगार म्हणून काही मजूर व काही यंत्र सामग्री काम सुरु असणाऱ्या परिसरातून घेतले जाते मात्र कामे पूर्ण न करता बिले उचल करून कंत्राटदार पोबरा करीत असल्याने स्थानिकांची फसवणूक होऊन मजूरी, ट्रॅक्टर व इतर साहित्याचे भाडे बुडविले जात आहे, नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यास, कंत्राटदारांच्या अनागोंदी कार्यात हिस्सेदार असणारे अधिकारी हात वर करून आम्ही काही करू शकत नाहीत, अशा भूमिकेत असतांना दिसुन येतात. त्यामुळे नागरिकांना कुठेही दाद मिळत नाही.
रस्ता निर्माण, दुरुस्ती कामांवरील होणारी वाहनांची जाळपोळ माओवाद्यांकडून केल्या जात आहेत, की आणखी कोणी कंत्राटदाराचे पीडित अज्ञातांकडून अशी शंका उपस्थित केली जात असून काही ठिकाणी गावकऱ्यांनी बैठकी घेऊन शंका उपस्थित केल्या आहेत. तालुक्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सड़क, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अशा योजनांच्या मार्फत जारावंडी, दोलंदा, शिरपुर, वडसा खुर्द, जाबुळगट्टा, सरखेडा, रेचा, सोहगाव, कुरुमवाडा, वेळमागड, उडेरा, बुर्गी, कांदोळी, मरकल, वट्टेगट्टा, गट्टेपल्ली, हालेवारा, हनपायली, इरपनपायली, घोटसुर, गुरूपल्ली, बिड्री, पुनागुडा, ताटीगुडम, एटापल्ली, झारेवाडा, तोडसा, कारमपल्ली, कोटी, कमके, वाघेझरी, ऐमली, मंगूठा, पुसुमपल्ली, नेंडेर, गट्टा, गट्टागुडा, कोतरी, गिलनगुडा, झारेवाडा, पुस्कोटी, डोडूर, रेकनार, मंगेर, पामाजीगुडा, कोंदावाही, पिंडीगुडम, बेसेवाड़ा, आलेंगा, रोपी, गावांना जोडनारे रस्ता निर्माण व दुरुस्ती कामे केली जात आहेत.
सदर कामांच्या दर्जात सुधार करण्याकरिता तसेच मजूरांची मजूरी व इतर साहित्याचे भाड़े कंत्राटदारांकडून नागरिकांना मिळवून देण्यास वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करून दोषीवर कार्यवाहीची मागणी नागरिकांनी केली आहे.
मजूरांची मजूरी व साहित्य वापराचे भाड़े कंत्राटदारांनी दिले पाहिजे, रस्ता निर्णाण व दुरुस्ती कामांच्या दर्जाची चौकशी करून दुरुस्ती केल्या जाईल- वामन बोधलवार, कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद बांधकाम, उपविभाग एटापल्ली
पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना कामाच्या दर्जा कमकुवत असल्याची कोणतीही तक्रार आपनाकडे नाही तशी तक्रार आल्यास चौकशी करून दर्जा सुधारण्यात येईल. राजेश गंपावार, कनिष्ठ अभियंता पंतप्रधान, पंतप्रधान ग्राम सड़क योजना, कार्यालय, गडचिरोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.