मोखाडा - भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्रमजीवी संघटनेने जनतेच्या मूलभूत अधिकारासाठी रान पेटवले आहे. त्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित स्वतः मैदानात उतरले आहेत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत करण्यात येणारी नळपाणीपुरवठा योजनेचे कामे सदोष होत आहेत. त्यामुळे या पुढे 'एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा' असे मोर्चे प्रत्येक ग्रामपंचायतीवर काढायचे, असे आवाहन विवेक पंडित यांनी आपल्या आजच्या जव्हार, मोखाड्यातील सभेत महिलांना केले आहे.
जव्हार तालुक्यात चालतवड, चोथ्याचीवाडी आणि मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथे विवेक पंडित यांनी भेटी दिल्या तर चोथ्याचीवाडी आणि डोल्हारा येथे सभा घेतल्या आहेत. या सभांना मोठ्या संख्येने आदिवासी महिलांनी गर्दी केली होती. जल जीवन मिशन योजनेत जाहीर केल्या प्रमाणे प्रत्येकाला नळाद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायला हवे, यासाठी आता संघटना आणि संघर्ष याशिवाय पर्याय नाही असे पंडित यांनी सांगितले.
यावेळी पंडित यांनी स्वप्नातही नसेल कुणाच्या अशी योजना म्हणजे जल जीवन मिशन ही देशाच्या पंतप्रधानांनी निधीच्या स्वरूपात प्रत्यक्षात आणली आहे. म्हणूनच प्रत्येक झोपडीत, घरात, झापात, बंगल्यात, प्रत्येक गरीब श्रीमंत प्रत्येक नागरिकाला नळाने स्वच्छ पाणी मिळायचा अधिकार असून तो मिळत नसेल तर मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही. ही लढाई लढण्याचा श्रमजीवीचा पक्का निर्धार असल्याचे पंडित यांनी सांगितले आहे.
जल जीवन मिशन योजनेच्या मनमानी आणि गैरव्यवाराविरोधात श्रमजीवी संघटना आता प्रचंड आक्रमक होताना झाली आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांचे जिल्हा व्यापी दौरे सुरू झाले आहेत.
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 2 ते 20 एप्रिल पर्यंत विवेक पंडित स्वतः प्रत्येक तालुक्यात काही गावात जाऊन जाहीर सभा घेऊन जलजीवन मिशन बाबत जनजागृती करणार आहेत. त्याची सुरूवात 2 एप्रिल पासुन जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यातुन केली आहे.
या सभेमध्ये विवेक पंडित यांनी जल जीवन मिशन योजनेबाबत पंतप्रधानांचा महत्त्वाकांशी प्रकल्प कसा, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि गैरव्यवहार करण्याच्या धोरणाने धुळीस मिळत आहे याचा कच्चा चिठ्ठा मांडला आहे.
या पुढचे मोर्चे 'एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा' असे काढायचे, असे आवाहन विवेक पंडित यांनी आपल्या आजच्या सभेत केले. जव्हार तालुक्यात चोथ्याची वाडी आणि मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथे आज विवेक पंडित यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. या सभाना येथील नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
जलजीवन मिशन नळपाणीपुरवठा योजनेचे काम करताना पाण्याचे स्त्रोत निवडण्यापूर्वी, तेथे भूगर्भ जलशास्त्रज्ञ यांचा प्रत्यक्ष पाहणी केलेला अहवाल असणे क्रमप्राप्त आहे. ज्या ठिकाणी हे अहवाल दिले गेले आहेत, मात्र तरीही तेथील विहिरी या कोरड्या पडलेल्या आहेत.
याचाच अर्थ भू गर्भजल शास्त्रज्ञांनी दिलेले दाखले कार्यालयात बसून चिरीमिरी घेऊन, गैरव्यवहार करून दिलेले दाखले आहेत. ते अधिकृत (ऑथेंटिक) दाखले नाहीत. याचाच परिणाम पूर्ण योजना फेल ठरवून लोकांचा पाण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असून शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा चुराडा होत आहे असा आरोप पंडित यांनी केला आहे.
याबाबत आता समजवी संघटनेने आणि प्रत्येक नागरिकांनी मग तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असू देत प्रत्येकाने या पाण्याच्या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये रस्त्यावर उतरले पाहिजे असं आवाहन विवेक पंडित यांनी यावेळी केले आहे.
श्रमजीवी संघटनेच्या संघटनेचे आता जिल्हा भरात प्रत्येक ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चे निघत आहेत, रिकामा हंडा घेऊन येथील सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन आपल्या पाण्याचा अधिकार मागत आहे. हा मोर्चा केवळ हंडा मोर्चा नसावा तर यापुढे निघणारे सगळे मोर्चे 'एका हातात हंडा आणि दुसर्या हातात दांडा' असावा असे आवाहन यावेळी पंडित यांनी केले.
आपल्या हातात तीन फुटाचा असलेला दांडा हा कोणाला मारण्यासाठी नसून तर आपल्या गावातील जल जीवन योजनेचे काम अंदाजपत्रका प्रमाणे झाले आहे का? येथे टाकलेली पाईपलाईन ही जमिनीच्या आत तीन फुटापर्यंत खोलवर टाकलेली आहे का? हे तपासण्याचं काम प्रत्येकाने करायचं आहे.
ते तपासण्यासाठी तीन फूट लांबीचा दांडा आपण हातात ठेवायचा आहे असे पंडित यांनी आपल्या आवाहनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे जलजीवन मिशन योजनेच्या अपहाराची अनेक प्रकरणे बाहेर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.