मोताळा : तारापूर येथील प्राणीमात्रांचा बळी वर्ज्य असलेले अंबादेवी संस्थान सर्वांचेच श्रद्घास्थान आहे.
नवरात्रात तारापूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. हे एक जागृत देवस्थान आहे. ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ते दर्शन घेऊन उडदाच्या भाकरीने नवस फेडतात. देवीचे संस्थान म्हटले की अनेक ठिकाणी प्राणिमात्रांच्या बळीने नवस फेडला जातो, मात्र येथे तसा प्रकार नाही.
सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी राजा हरिश्चंद्र यांच्या स्वप्नात आलेल्या महर्षी विश्वमित्र यांच्या शब्दानुसार त्यांनी वनवास घेतला व त्यानंतर काही वेळेसाठी राजा हरिश्चंद्र, राणी तारामती, राजकुमार रोहिदास, शेषनाग यांच्या आगमनाने पावन झालेली भूमी म्हणजेच आजचे श्रीक्षेत्र तारापूर होय.
पूर्ण भारतामध्ये फक्त उज्जैन आणि तारापूर या दोनच ठिकाणी हरिश्चंद्र तारामती यांचे मंदिर आहे. कोथळी गावामध्ये स्थापन महादेवाचे दोन हेमाडपंथी शिवालय पुरातन वास्तुकलांचा एक अद्भुत नमुना आहे.
श्रीक्षेत्र तारापूरमध्ये राजा हरिश्चंद्राने श्रीअंबादेवीच्या मूर्तीची स्थापना केली. अंबादेवीच्या उपासनेमुळेच राजा हरिश्चंद्र आणि त्यांच्या परिवाराचा वनवास संपला अशी आख्यायिका आहे. राजा हरिश्चंद्र व त्यांचा परिवार येथून गेल्यावर येथील आदिवासींनी श्रीगणेश, राजा हरिश्चंद्र, राणी तारामती, राजकुमार रोहिदास व शेषनाग यांच्या मूर्तींची स्थापना करून एक विशाल हेमाडपंथी मंदिर येथे बनविले.
अध्यात्म व पर्यटनचा संगम
नवरात्र महोत्सवात येथे दुपारी बारा वाजता व सायंकाळी पाच वाजता अशा दोन वेळा आरती होते. येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार बुलडाणा अर्बन परिवाराने परिसरातील नागरिक व भाविक भक्तांच्या सहकार्याने केला आहे. तारापूर परिसर आध्यात्मसहित एक पर्यटन स्पॉट म्हणून नावलौकिकास येत आहे. परिसरातील डोंगर, हिरवळ, ओव्हरफ्लो असलेला पलधग प्रकल्प, यावर असलेली बोटिंग, ज्ञानगंगा अभयारण्य व त्यातील जंगल सफारी असा अध्यात्म व पर्यटनाचा सुरेल संगम येथे बघण्यास मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.