नवेगावबांध (जि. गोंदिया) : कधी रिमझिम तर कधी वादळवाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुन्हा मध्ये मध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, हे सारे सहन करत जीर्ण घरात रवी वाघाडेचे कुटुंबासह वास्तव्य करीत आहे. त्याने घरकुलासाठी अर्ज केला आहे; मात्र, गेल्या चार वर्षांपासून तो धूळखात पडला आहे. परिणामी, घर पडण्याची भीती असल्याने रवीला रात्र जागून काढावी लागत आहे.
येथील प्रभाग क्रमांक दोनमधील रहिवासी रवी रामा वाघाडे हा 78 वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकराबाळांना घेऊन घरात राहत आहे. त्याच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्त्याचा बंगलाच. ढकलून दिले तरी पडून जाईल, अशी त्याच्या घराची अवस्था. चार वर्षांचा कालावधी लोटूनही आश्वासनापलीकडे त्याला अत्यंत गरज असताना घरकुल मिळाले नाही. अल्पभूधारक असलेला रवी पारंपरिक गुराख्याचा व्यवसाय करतो. गावातील गाई-ढोरं, शेळ्या राखण्याचे त्याचे काम आहे. वडिलोपार्जित जीर्ण झालेले घर त्याच्या वाट्याला आले. घर एवढे जीर्ण झाले आहे, ते केव्हाही पडू शकते. त्यामुळे पावसाळ्यात रात्रीच्या वेळी डोळ्याला झोपच येत नाही, रात्रभर जागत राहावे लागते, अशी व्यथा रवी वाघाडे यांनी सांगितली.
सरपंचाला माझी राहण्याची व्यवस्था कुठेतरी करा, अशी विनंती करून झाली; परंतु त्यांनी लक्ष दिले नाही, अशी कैफियत रवीने मांडली. आता लोकांनी पाळीव जनावरे, गाय-बैल, म्हशी पाळणे बंद केले. पाळीव जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पारंपरिक गुराख्याच्या व्यवसायात काही दम राहिला नाही. त्यामुळे मिळेल ती रोजीरोटी करून म्हाताऱ्या आईसह दोन मुलांचे पालन-पोषण रवी व त्याच्या पत्नीला करावे लागते. जगण्याचा प्रश्न गंभीर झाला, तर घर बांधायला पैसे कुठून आणायचे, हा खरा सवाल रवीच्या डोळ्यासमोर भयानकपणे नाचतो आहे. ज्यांना राहायला घर आहेत, ते पक्के घर पाडून घरकुल बांधतात. परंतु, मला गरज असून घर मिळत नाही, ही खरी तडफड रवीची आहे. मुलगी बाराव्या वर्गात तर मुलगा दहावीत. मात्र, गेल्या चार वर्षांपासून घरात हक्काची वीज नाही.
तीच अवस्था प्रभाग क्रमांक पाचमधील सकून व भारती रामदास पात्रे यांची आहे. हे कुटुंब तर भूमिहीन आहे. भारती व तिचे कुटुंबीय गेल्या आठ वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा करीत आहेत. आठ वर्षांत अनेक पावसाळे व अवकाळी पाऊस रात्रंदिवस सोबतीला घेऊन जुन्या पडक्या घरात गुजराण करीत आहेत. ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवून झाले. पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या कितीतरी फेऱ्या झाल्या. परंतु, घरकुलाचा योग त्यांच्या नशिबी आला नाही. ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्षभरापूर्वी येऊन गेले. परिस्थिती पाहून गेले, फोटो काढून नेले, परंतु भारती व शकुन अजून गेल्या 8 वर्षांपासून वेटिंग लिस्टवरच आहेत.
भारती म्हातारी सासू, दोन मुली, तर तिची जाऊ सकुन महादेव पात्रे तीही विधवा. दोन मुले, सून नातवंडे घेऊन या घरात जीव मुठीत धरून राहतात. मुसळधार पाऊस आला की घरात पडणाऱ्या पावसाच्या धारा गंजात, भांड्यात झेलत रात्र काढतात. घरची करती माणसं मरण पावल्यामुळे पारंपरिक कुंभार व्यवसाय मोडकळीस आला. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत उदरनिर्वाह करायचा, मुलाबाळांचे शिक्षण, म्हाताऱ्या डोळ्याला न दिसणाऱ्या सासूचा औषधोपचारही करायचा. अशी बेताची जिंदगानी पात्रे कुटुंबीय करीत आहेत. दोघीही जणी मोलकरणीचे काम करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जीवन जगण्याला पैसे पुरत नाही, तर मग घर बांधायला पैसे आणायचे कुठून? हा या कुटुंबासमोर यक्ष प्रश्न. हे येथील दोन उदाहरणे आहेत.
गावात आणखी असे लोक आहेत की, ज्यांना तातडीने घरकुलाची गरज आहे. परंतु, "सरकारी काम घडीभर थांब' या न्यायाने घरकुलाची अत्यंत आवश्यकता असणाऱ्या कुटुंबांची परवड होत आहे. रवी वाघाडे, भारती, सकून पात्रे यासारख्या अशा अनेक कुटुंबांची घरकुलाअभावी जीव मुठीत धरून जगण्याची व पर्यायाने ससेहोलपट होण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने अशा गरजू कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करावे, अशी मागणी होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल काय? हा खरा गंभीर प्रश्न आहे.
23 लाभार्थ्यांचे घरकुलाचे प्रस्ताव पाठविले
मागच्या वर्षी अतिवृष्टीमध्ये ज्यांचे घरे पडले व जी पडण्याच्या मार्गावर आहेत, असे रवी वाघाडेसह एकूण 23 लाभार्थ्यांचे घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविले आहेत. ते प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप ते मंजूर झाले नाहीत. पुनर्वसन करण्याचे काम तालुका आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे आहे.
- अनिरुद्ध शहारे, सरपंच, नवेगावबांध.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.