दारव्हा (जि. यवतमाळ ) : तालुक्यातील हातोला येथे सोमवारी (ता. 2) एका महिलेचा अर्धवटस्थितीत जळालेला मृतदेह आढळून आला होता. तिच्या कानातील रिंग व मंगळसूत्रच तपासाचा विशेष धागा ठरला आहे. या घटनेचा उलगडा करण्यात पोलिस पथकांना अवघ्या काही तासांत यश आले. संशयित राजू श्रावण मुंदे (वय 40, रा. माळीपुरा, कारंजा), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील हातोला गावापासून काही अंतरावर असलेल्या अवधूत महाराज मंदिराच्या मागे जंगलात एका अनोळखी महिलेचा अर्धवटस्थितीत जळालेला मृतदेह गुराख्याला दिसला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी महिलेचे अर्धवट जळालेले शरीर आढळून आले. जमिनीवर रक्ताचे डागसुद्धा आढळून आले होते. मृत महिलेच्या कानातील रिंग व गळ्यातील मंगळसूत्र घटनास्थळावरून आढळले. पोलिसांकडे तपासाचा हाच एकमेव धागा होता. या घटनेचा उलगडा करण्यासाठी तीन पोलिस पथकांकडे जबाबदारी देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे यांनी जवळच असलेल्या सोमठाणा, उमर्डा बाजार, सुकळी कारंजा, असा शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला.
तपासचक्रे वेगात फिरवीत असताना कारंजा पोलिस ठाण्यातून हरविलेल्यांची माहिती घेतली. जया दहिलेकर (रा. भडशिवणी) ही महिला कामाच्या शोधात गेल्यापासून घरी परत आलीच नाही, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच संबंधित महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. महिलेचे राहनीमान व अंगावरील दागिने दाखविले. कानातील रिंग व मंगळसूत्र बघून नातेवाइकांनी सदर महिला जया असल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच राजू मुंदे याला ताब्यात घेतले असता, खुनाची कबुली दिली. अतिशय गुंतागुंतीच्या तपासाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस अधीक्षकांची टिप्स -
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याची सविस्तर माहिती घेऊन तपासासाठी पोलिस पथकांना टिप्स दिल्या. एसडीपीओ चंदेल, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे आदींनी ही कारवाई केली.
पुन्हा दोघे गजाआड -
महिलेच्या जळीत खूनप्रकरणी आरोपीच्या मुलासह दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, शनिवारपर्यंत (ता. 7) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. योगेश राजू मुंदे (वय 20) व रुपेश हिरालाल ब्राम्हणे (वय20) यांना अटक करण्यात आली, तर राजू मुंदे (सर्व रा. कारंजा) याच्या मुस्क्या कालच आवळण्यात आल्या होत्या. राजू व मृत महिला यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते.
फिरायला आले अन् झाला घात -
राजू व महिला दोघेही हातोला शिवारात दुचाकीने सोमवारी फिरायला आले. तिने वेफर खाण्यास नकार दिला. त्यामुळे संशयिताने तोंडावर मोठा दगड टाकून खून केला. घाबरलेल्या अवस्थेत आरोपीने घर गाठून हकिकत मुलगा व त्याच्या मित्राला सांगितली. परत घटनास्थळ गाठून ओळख पटू नये, यासाठी पेट्रोल टाकून महिलेला पेटवून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.