नवेगावबांध : 26 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत मलकाझरी येथे वास्तव्याला असलेला हत्तीचा कळप आता परतीच्या प्रवासाला लागला असून सध्या गेल्या तीन-चार दिवसांपासून इटियाडोह धरण परिसरात त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. हत्तीच्या दर्शनासाठी पर्यटकांची पावले सध्या इटियाडोह धरणाकडे वळत आहेत.
15 जून रोजी हत्तींचा कळप चुटीया ते झाशीनगर येथील जंगलमार्गे भ्रमंती करत रात्री अंदाजे 12 वाजता तिडका या गावामध्ये पोहोचला. या गावाशेजारी एक वनतलाव आहे. त्या ठिकाणी बराच वेळ थांबला. जेव्हा गावकऱ्यांना हत्तीच्या ओरडण्याचा आवाज आला, तेव्हा गावकरी घाबरून एकमेकांच्या घराच्या छतावर जावून थांबले होते.
या दरम्यान हत्तींनी कोणालाही कसलाच त्रास न देता पुढे येरंडी दर्रेच्या जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. 16 जून रोजी परत सकाळी 10 च्या सुमारास हत्तीच्या कळपाचे लोकांना दर्शन झाले. इटियाडोह जलाशयामध्ये हत्तीचा कळप अंघोळ करताना एक किलोमीटर अंतरावरून बऱ्याच नागरिकांनी त्यांना पाहिले. कळप येरंडी जंगलमार्गे इटियाडोह धरणाकडे वळला आहे, अशी माहिती तिडका, येरंडी येथील गावकऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन डोंगरवार यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच जिल्ह्यात धूमाकुळ घातलेल्या हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात 26 एप्रिल रोजी पुनरागमन केले होते.
मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात हा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला होता. नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत कवठा जंगल परिसरात हत्तींनी बस्तान मांडले होते. बोळदे, कावठा, डोंगरगाव, इंजोरी, अरततोंडी, बोरटोला, सिरेगावबांध या गावात हत्तीच्या कळपाने धान व ऊस पिकांचे नुकसान केले होते. नंतर हत्तीचा कळप भंडारा जिल्ह्यात दाखल झाला होता. हे येथे उल्लेखनीय आहे.
याच कालावधीत 3 ऑक्टोबर 2022 ला हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तिडका येथील एका आदिवासी शेतकऱ्याला ठार केले होते. जवळपास 15 दिवस या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर, 12 ऑक्टोबरच्या रात्री नागनडोह येथील आदिवासींच्या वस्तीवर हल्ला करून त्यांच्या घराची व इतर जीवनोपयोगी साहित्याची नासधूस केली होती.
त्यामुळे गावातील भयभीत आदिवासी जीव मुठीत घेऊन गाव सोडून पळाले होते. हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वळला होता. भंडारा जिल्ह्याचा प्रवास करून पुन्हा छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या सीमेवरून हत्ती दूर निघून गेले होते.
हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली होती. हत्तीच्या कळपाची हालचाल व धोका लक्षात घेऊन वनविभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पथकांसह सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
26 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव वन्यजीव अभयारण्यातील मलकाझरी परिसरात हत्तीचे वास्तव्य होते. त्यानंतर, आता चुटिया गावाजवळ रस्ता आेलांडत तिडका मार्गे गोठणगाव बॅक वॉटर क्षेत्रात सध्या हत्ती वास्तव्याला आहेत. हत्ती दिसल्यास मागे लागू नये, ओरडू नये, हॉर्न वाजवू नये, वनरक्षक, वनपाल यांना कळवावे, हत्ती कधीच एका जागेत स्थिरावत नाही. होऊ शकते परतीच्या प्रवासाला लागले असावे. ते गडचिरोली मार्गे छत्तीसगढकडे परत जाण्याची शक्यता आहे.
-सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी नवेगावबांध, राष्ट्रीय उद्यान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.