आष्टी (शहीद) (जि.वर्धा) : येथील नवीन आष्टी (आयमा) येथे पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. जगदीश भानुदास देशमुख (वय ३५) असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी दीपाली (वय ३१) आणि तिचा प्रियकर शुभम जाधव (वय २२) याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. (Vidarbh Crime News)
शुक्रवारी (ता. चार) सकाळच्या सुमारास येथील रस्त्यावर एका पोत्यात मृतदेह आढळून आला. पोत्यात मृतदेह दिसताच माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटास्थळ गाठून पाहणी केली असता त्यात जगदीश देशमुख यांचा मृतदेह मिळून आला. येथूनच या हत्येचा उलगडा झाला.
नवीन आष्टी येथील जगदीश देशमुख आणि पत्नी दीपाली देशमुख हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. जगदीश हा घर बांधकामाच्या कामातून आपला उदरनिर्वाह भागवित होता. त्याला दारूचे व्यसन होते. अशातच जगदीशची पत्नी दीपालीचे शुभम जाधव याच्याशी प्रेम जुळले. याच कारणातून दीपालीचा प्रियकर शुभम जाधव व जगदीश देशमुख यांच्यात नेहमीच बाचाबाची व भांडणे होत होती. तीन दिवसापूर्वी पत्नी दीपाली देशमुख व पती जगदीश देशमुख यांच्यात भांडण झाले होते. ही माहिती जगदीश देशमुख यांच्या बहिणीच्या कानावर गेली. जगदीशची आई आजारी पडल्याने हा भांडणाचा वाद पोलिसात पोहोचला नाही.
यातूनच जगदीशला संपविण्याचा कट रचण्यात आला. दीपालीने प्रियकर शुभम जाधवच्या मदतीने पती जगदीशचा काटा काढण्याचा बेत रचला. यात या दोघांनी जगदीशला सेंट्रींगच्या दांड्याने बेदम मारहाण केली. या महाराणीत जगदीशचा मृत्यू झाला. पती जगदीश मरण पावला अशी खात्री झाल्यावर त्याचा मृतदेह पोत्यात भरून घराच्या मागील बाजूस नेऊन टाकला. पहाटे उजाडल्यावर रक्ताने माखलेले पोते कशाचे आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. पत्नीने घटनास्थळ गाठून आक्रोश केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.
या प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, प्रभारी पोलिस उपविभागीय अधिकारी गोकुळसिंग पाटील तसेच पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ठाणेदार लक्ष्मण लोकरे करीत आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचारी पीएसआय केकण, पीएसआय देरकर, शेख नबी, बालू वैराळे, राहुल तेलंग, संजय बोकडे हे उपस्थित होते. सदर घटनेतील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे फुटले बिंग
सदर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी फोरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली. मृतकाच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर चौकशीसाठी पत्नीला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीअंती प्रकरणाचे बिंग फुटले. जगदीश देशमुख यांची हत्या ही प्रियकराच्या मदतीने करण्यात आल्याचे उघड झाले. यावरून दोघांना अटक करण्यात आली.
फसला मृतदेहाच्या विल्हेवाटीचा प्रयत्न
पोत्यात भरलेल्या मृतदेहाची विल्हेवाट जेथून होणार होती त्याच परिसरात रात्री ट्रॅक्टर मधून डिझेल चोरी करणारे चोरटे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डिझेल चोरट्यांना पकडण्याकरिता पोलिस त्याच परिसरात घिरट्या घालत होते. हे लक्षात आल्यावर दीपाली व तिच्या प्रियकराचा मृतदेह विल्हेवाटीचा प्रयत्न फसला. त्यांनी मृतदेह टेकाडे यांच्या घरासमोर टाकून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.