तेल्हारा : झोपेत असतांना नदीला अचानक पूर आला व त्या पुराच्या पाण्यात तब्बल दोन तास वाहत असतांना एक-दोन नव्हे, तर चक्क तीन लाकडाच्या ओंडक्याचा सहारा मिळाला व शेवटी कसबसे प्राण वाचले. ही कुठल्या चित्रपटातील कथानक नसून, ही घटना तालुक्यातील पाथर्डी येथील पृथ्वीराज चव्हाणसोबत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरजवळा ता. पाचोरा जी. चाळीसगाव येथील मूळचा रहिवासी असलेला पृथ्वीराज दिलीपसिंग चव्हाण (वय १६) हा लहानपणापासून तालुक्यातील पाथर्डी येथील रहिवासी असलेले त्याचे मामा विक्रम शेरसिंग बानाफर यांचेकडे शिक्षणाकरीता राहत असून,
तो नीलकंठ हाईस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत आहे. तो त्याचे मामा अंकित संग्रामसिंग बनाफर (वय ३२) यांच्यासह शेतात नवांकुरीत पिकाचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्याकरिता ता. २१जुलै रोजीच्या रात्री गेला होता.
मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत जागल्यानंतर ते ट्रॉलीवर असलेल्या बाजीवर झोपले. शेत नदी काठावर असल्याने व रात्री सतत पाऊस सुरू असल्याने नदीला रात्री साडेतीन वाजताचे सुमारास अचानक पूर आला व ट्रॉलीमध्ये पाणी शिरल्याने पृथ्वीराजने मामा अंकितला झोपेतून उठविले व ट्रॉलीमध्ये पाणी शिरल्याबाबत सांगितले असता, मामाने त्याला पाण्यात उडी मारण्याचे सांगितले व स्वतः पाण्यात उडी घेतली. परंतु, पृथ्वीराजची पाण्यात उडी घेण्याची हिम्मत झाली नाही
व तेवढ्यात पाण्याच्या वेगाने अचानक ट्रॉली पलटी झाली व तो पाण्यात वाहू लागला. पाण्यात वाहत असतांना प्रवाहात अचानक त्याला लाकडी ओंडका आढळून आला व त्याने त्या लाकडी ओंडक्याचा सहारा घेत काही अंतर कापले.
परंतु, काही अंतर कापल्यानंतर त्याचा हाथ सुटला व तो पाण्यात बुडू लागला. परंतु, देव बलवत्तर म्हणून लगेच त्याला दुसरे व नंतर तिसरे, असे लाकूड मिळाले व तो जवळजवळ दोन तास पाण्याचा प्रवाहात वाहत-वाहतपांच किलोमीटर अंतर कापून पंचगव्हाण पोहचला व एका काटेरी झुडपाला अडकला.
पुराचे पाणी उतरेपर्यंत तो त्या काटेरी झुडपावर बसला. ता. २२ जुलै रोजी सकाळी पाणी उतरल्यावर तो उतरला व कसाबसा पंचगव्हाण गावात आला.
तिथे त्याला तलाठी श्री. डोंगरे, श्री.घाटे, पोलिस पाटील गजानन वाघोडे, तंटामुक्त अध्यक्ष गब्बर जमादार, एनुल्ला खान, शेख सादिक, सैफुल्ला खान यांनी त्याला खासगी दवाखान्यात नेले. येथे डॉक्टरांनी त्याचेवर उपचार केले. पृथ्वीराज चव्हाण याने आपली आपबीती कथन केली. त्याची आपबीती ऐकून ‘देव तारी त्याला कोण मारी’ हे शब्द अनेकांच्या मुखातून आपसुकच निघाले. वृत लिहेपर्यंत त्याचा मामा अंकित बेपत्ता असून, त्याची शोधशोध सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.