गडचिरोली : सरकारने डोक्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवलेला आणि हातात सतत एके ४७ बाळगत निबिड अरण्यात नक्षल चळवळीचे नेतृत्व करणारा तो आणि त्याच्याच सारखी निडर हाती बंदूक घेऊन फिरणारी सरकारकडून ५ लाखांचे बक्षीस असलेली ती. नक्षल चळवळीत असलेल्या या दोघांचे प्रेम फुलले ते हिंसेच्या रानात. पण, त्यांच्यातील प्रेमाला हिंसेचा वीट आला आणि त्यांनी आयुष्याचा नीट विचार करून थेट आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात टाकले आणि सुखी संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या या दोघांच्याही चेहऱ्यावर कित्येक वर्षांनी हसू उमलले.
ही अनोखी प्रेमकथा आहे नक्षलवाद्यांच्या चळवळीचा डीव्हीसी कमांडर गोकूळची आणि दलम सदस्य असलेल्या सरिताची. नक्षल चळवळीत गोकूळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणाचे खरे नाव संजू सन्ना मडावी असून तो भामरागड तालुक्यातील केळमारा या अतिदुर्गम गावातला आहे. अवघ्या १६ व्या वर्षी तो पेरमिली दलममध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्याने प्लाटून क्र. ७, कंपनी क्रमांक ४ अशी प्रगती करत २०१६ मध्ये नक्षल चळवळीत अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे डीव्हीसी (विभागीय समिती सदस्य) पद मिळवले.
कवंडे या गावात राहणारी सरिता मासा पल्लो ही भामरागड दलममध्ये २०१२ या वर्षी सहभागी झाली. २०१५ मध्ये या दोघांची ओळख झाली. अनेक मोहिमा एकत्र करताना त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला. नक्षल चळवळीत लग्नाला विरोध नसला, तरी लग्नानंतर पती-पत्नीला एकत्र राहू दिले जात नाही. त्यामुळे इथे राहिलो, तर आपले प्रेम आणि संसार कधीच फुलणार नाही, हे या दोघांच्याही लक्षात आले. मग गोकूळ आणि सरिताने त्यांचे दलम टिपागड परिसरात असताना लघुशंकेचा बहाणा करून थेट पलायन केले. कसेबसे ते कसनसूरपर्यंत पोहोचले. गोकूळच्या भावांनी पोलिसांशी संपर्क साधून या दोघांचेही आत्मसमर्पण घडवून आणले. २०१९ मध्ये आत्मसमर्पण केलेल्या या दोघांच्या प्रेमाची परिणती तब्बल तीन वर्षांनी रविवार (ता. १३) मंगल परिणयाच्या रूपात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.