पवनार (जि. वर्धा) : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरांतून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अचानक आलेल्या या आजाराने जागतिक महामारीचे रुद्र रूप धारण केले. तोकडी यंत्रणा एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला कशी पुरणार, हा प्रश्नच होता. परंतु, हा कहर थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा, पोलिस यंत्रणा कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांनी अल्प मानधनात गावागावांत जाऊन जिवाची पर्वा न करता कोरोनाला रोखण्यास मोलाची कामगिरी बजावली. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील आशा स्वयंसेविका अर्चना घुगरे यांच्या कार्याची दखल ‘टाइम मॅगझिन’ने घेतली. ‘टाइम मॅगझिन’मध्ये झळकल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आरोग्य विभागात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावागावांत प्राथमिक मदत करण्यासाठी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली जाते. लोकसंख्येच्या तुलनेत हजार व्यक्तीच्या मागे एक आशा असे गुणोत्तर लावले जाते. मात्र, त्यासाठी त्यांना १,५०० रुपये एवढे अल्प मानधन दिले जाते. या अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांवर प्रकाश टाकण्यासाठी टाइमच्या पत्रकार अवंतिका यांनी अर्चना यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून झूम ॲपच्या माध्यमातून कामाविषयी माहिती जाणून घेतली. त्याबाबत त्यांनी काही व्हिडिओ देखील दिले.
अर्चना घुगरे यांनी दिलेल्या माहितीला सर्वाधिक पसंती मिळाल्यामुळे त्यांची कथा टाइममध्ये सचित्र झळकली. अवघे बारावी शिकलेल्या अर्चनाचे पती आयटीआय व पदवीधर आहेत. त्यांच्याकडे तीन एकर शेती असली तरी ते एका दुकानात स्टोअर कीपरचे काम करतात. कोरोनाकाळात संचारबंदीमुळे नोकरी गेली व तेसुद्धा त्या काळात बेरोजगार होते.
बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती घेणे, त्यांचे विलगीकरण करणे, कुणाला काही लक्षणे असल्यास तपासणीसाठी प्रवृत्त करणे, लपून-छपून कुणी आल्यास त्यांची माहिती प्रशासनास देणे, सर्वेक्षण करणे, स्तनपान, गरोदर मातांची माहिती घेणे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याचे अर्चना यांनी सांगितले.
आतातरी शासन लक्ष देईल?
कुणाच्या संपर्कात आल्यास कोरोना होण्याची भीती असायची. तरीदेखील सर्व स्वयंसेविकांनी प्रामाणिक सेवा दिली. परंतु, त्याच्या मोबदल्यात फक्त १,५०० रुपये मानधन मिळते. त्यात तीन महिन्यांच्या काळात १,००० रुपये महिना अतिरिक्त मानधन मिळणार होते. तेवढेच देऊन आमची बोळवण करण्यात आली. आमच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. परंतु, टाइम मॅगझिनने आमच्या व्यथा जगासमोर मांडल्याने शासन लक्ष देईल?
- अर्चना घुगरे,
आशा स्वयंसेविका, पवनार, जि. वर्धा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.