भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या महापुरानंतर शहरातील पाणीपुरवठा योजनेची विहीर व जलशुद्धीकरण केंद्रात गाळ साचल्याने योजना सुरू झाली नाही. नगर परिषदेकडून तीन दिवसांत साफसफाई करून नळयोजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, या कामाला विलंब होत असल्याने शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले. महिलांना टॅंकर व हातपंपाचे पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
जिल्ह्यात 28 ऑगस्टला संततधार पाऊस झाला. यामुळे नदीनाल्यांना पूर आला असताना जिल्ह्यातील व जवळच्या जिल्ह्यांतील धरणांचे पाणी वैनगंगा व तिच्या सहयोगी नद्यांना सोडण्यात आले. त्यामुळे 30 व 31 ऑगस्टला जिल्ह्यात पूर आला. यापूर्वी आलेल्या पूरापेक्षा या पुराची व्याप्ती मोठी होती. भंडारा शहरातील अर्धीअधिक वस्त्यांत पुराचे पाणी शिरले. नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. भंडाऱ्यासह पाच तालुक्यांना या पुराचा फटका बसला आहे.
पूर ओसरल्यावर पाणीपुरवठा योजनेची नदीकाठावरील विहीर, जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला होता. त्याची साफसफाई करून तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे संबंधितांनी सांगितले. त्याबाबत शहरात जाहीर सूचना देण्यात आली. मात्र, अद्याप नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांत 14 टॅंकरद्वारे दिवसभर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच काही भागातील महिला पुरुषांना हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे. त्यातच शहरात कोरोना आजाराचे संक्रमण वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी पाणी भरताना जीव धोक्यात टाकावा लागत आहे. आता पूर ओसरल्यावर आठ दिवसांचा कालावधी लोटला. तेव्हा शहरातील नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
गुरुवारपासून पाणीपुरवठा
शहरात दीड लाखांवर लोकसंख्या असून, पाणीपुरवठा योजनेद्वारे 90 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टॅंकरद्वारे कितीही वेळा पाणीपुरवठा केला तरी, ते पर्याप्त नाही. हातपंपाचे पाणी भरताना प्रतीक्षा करावी लागते. सार्वजनिक विहिरींचा उपसा होत नसल्याने त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्री. वाढई यांनी सांगितले की, आज, योजनेचे पंप सुरू करण्यात आले आहेत. शहरातील वस्त्यांत गुरुवारपासून नळयोजनेचे पाणी पुरविण्यात येईल.
वैनगंगेत गोसेधरणाचे बॅकवॉटर साचले आहे. त्यात कन्हान नदीद्वारे येणाऱ्या नागनदीच्या पाण्यामुळे संपूर्ण धरणातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्याचा रंग आणि चव बदलले असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल निरीने दिला होता. तेव्हापासून शहरात आरो कॅनचा घरोघरी पुरवठा करणारे 50 ते 60 व्यवसाय सुरू झाले आहेत. शहरातील प्रत्येक कुटुंबाकडे पिण्यासाठी कॅन किंवा घरी बसवलेल्या आरोचे पाणी वापरले जाते. त्यासाठी प्रत्येकाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.