Why only three leaves This is the answer Holi Special news 
विदर्भ

Holi Special : पळसाला पाने तीनच का? हे आहे उत्तर...

योगेश बरवड

नागपूर : होळीला शहरी भागात सरसकट कृत्रिम रंग वापरले जातात. परंतु, गडचिरोली आणि मेळघाटसारख्या आदिवासी भागात अजूनही पळसफुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंगच वापरण्यात येतात. गडचिरोली जिल्ह्यातील उदेगाव, मुंजालगोंडी, दवंडी या गावांमध्ये तर घरोघरी पळसफुलांचे रंग बनविण्यात लोक मग्न झाल्याचे रंगतदार चित्र आहे. पळस आणि पळसफुलांची कहाणी तर त्याहूनही रंगतदार आणि रंजक आहे.

पळसाच्या फुलांना गंध नसतो हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलही; परंतु या फुलांत असलेला मध खाण्यासाठी देशोदेशीचे पक्षी भारतातील पळसवनात येतात हे अनेकांना माहीत नसेल. पक्षी मध चाखून गेले की मग मधमाशाही घोंगावायला सुरुवात करतात. पळसाशी अनेक आख्यायिका गुंतलेल्या आहेत.

शंकराच्या तीन नेत्रांशी पळसाच्या तीन पानांची तुलना केल्याचे संदर्भ आहेत. त्याची रंजक कथा आहे. वसंत ऋतूत एकदा कामदेवाने पळसवृक्षावर बसून शंकरावर मदनबाण सोडला. शंकरांचा कोप झाला. त्यांनी तिसरे नेत्र उघडले. त्यात पळस आणि कामदेव भस्म व्हायला लागले.

मग पळसाने त्राही मम, त्राही मम म्हणत शंकराची याचना केली. ‘यात माझी काय चूक? मला का शिक्षा?’ यावर शंकराने लगेच उःशाप दिला. ‘हे पळसवृक्षा, तुझ्या ज्वालांची फुले होतील. तुझी पाने माझे नेत्र म्हणून ओळखली जातील.’  शंकराचे तीन नेत्र आणि पळसाला पाने तीन. आहे की नाही रंजक पौराणिक संदर्भ!

आंध्र, तेलंगणा आदी अनेक भागांत अजूनही म्हणूनच की काय शंकराच्या पूजेला लालभडक पळसफुलेच अर्पण करतात. एका पुराणकथेनुसार शिवपार्वतीचा एकांत भंग केल्याची चूक केल्यामुळे शापदग्ध झालेला अग्निदेव म्हणजे पळस असे मानण्यात येते. हिंदी साहित्यातही पळसाचे उदंड उल्लेख आढळतात. सुप्रसिद्ध हिंदी कवी नीरज यांची एक कविता आहे.

नंगी हरेक शाख
हरेक फुल है यतीम,
फीर भी पलाश सुखी है
इस तेज धूप में

प्राचीन साहित्यात रसभरे वर्णन

प्राचीन साहित्यात पळसाचे अनेक उल्लेख आढळतात. महाकवी कालिदासाने चंद्रकोरीप्रमाणे असलेल्या पळसपाकळ्यांना निसर्गदेवतेच्या अंगावरील नखक्षतांची उपमा दिली आहे. तर ‘गीतगोविंद’कार जयदेवांनी तरुण-तरुणींच्या मनाला ओरबडणारी मदनाची धारदार नखे म्हटले आहे. ‘ऋतुसंहारा’त पळसाला स्त्रीरूपात चितारले आहे. ‘गाथा सप्तशती’त पळस हा आदिम, अनागर शृंगारभावनेचा विश्वासार्ह साक्षीदार म्हटले आहे. लालभडक पळसफुलांनी शोभायमान झालेली भूमी जणू बुद्धचरणांना वंदन करणाऱ्या भिक्षू संघाप्रमाणे दिसते, असा उल्लेख बौद्ध वाङ्मयात आढळतो. ‘लिंग पुराणा’त पळसाचा उल्लेख ‘ब्रह्मवृक्ष’ केला असून तीन पानांना ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकराची उपमा दिली आहे.

खोडात सुप्त अग्नी

फाल्गुन महिन्याच्या प्रारंभापासूनच पळसाचे झाड बहरू लागते. चैत्रात सर्व पाने गळून पडतात. त्याची जागा फुले घेतात. मग लालभडक फुलांनी बहरलेला वृक्ष लांबून अग्निज्वाळांसारखा भासू लागतो. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशीही एक समजूत आहे. त्यामुळे यज्ञविधीत अग्नी प्रज्वलित करण्यासाठी पळसाच्या समीधा वापरण्यात येतात.

किंशुक आणि पॅरट ट्री

पोपटाला संस्कृतमध्ये ‘किंशुक’ हे पर्याची नाव आहे. पळसाची फुले लालभडक आणि पोपटाच्या चोचीसारखी दिसतात. त्यामुळे फुलांना ‘किंशुक’ असेही म्हणतात. अनेकदा पळसाचा इंग्रजीत ‘पॅरट ट्री’ असाही उल्लेख आढळतो. 

गावांचीही नावे

पळसगाव, पळासनेर आणि दस्तुरखूद्द कविवर्य ना. धों. महानोर यांचे गावही पळसाच्या नावावरच- पळसखेड. आहे की नाही गंमत!

तीन नव्हे, नावे अनेक

पळसाला पलाश वृक्ष म्हटले जाते. इतर देशात पळस आढळत नाही. मग पलाश हे संस्कृतनेच केलेले नामकरण असू शकते. पल म्हणजे मांस आणि अश म्हणजे खाणे. मग काय पलाश मांस भक्षण करणारा वृक्ष आहे की काय, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हटले जाते. अर्थात, रानाचा अग्नी. बुटिया मोनोस्पर्मा हे पळसाचे शास्त्रीय नाव. मोनोस्पर्मा हा ग्रीक शब्द आणि त्याचा अर्थ एक बीज असलेला. आहे की नाही आश्चर्य!

खूप गुणांची पळसफुले

पळसफुलांत खूप औषधीगुण असतात. मूत्रविकार आणि शरीरावरील सूज कमी करण्यासाठी उपयोग होतो. फुले शक्तिवर्धकही असतात. पळसाच्या पत्रावळीत केलेले भोजन चांदीच्या पात्रात केलेल्या भोजनाइतकेच आरोग्यदायी असते.

पळसाची वैशिष्ट्ये

  • मध्यम आकाराचे, १२ ते १५ मीटर उंची
  • वाढ मंदपणे, वर्षभरात जेमतेम एक फूट
  • पळसाला चपट्या शेंगा येतात. त्याचे नाव  ‘पळसपापडी’
  • काळ्या रंगाच्या कळ्यांची फुले होतात.
  • लालभडक, पिवळी फुले दिसतात. पांढरी फुले दुर्मीळच  

औषधीगुण असल्याने फायदाच
नागपूर जिल्ह्यातही आदिवासीबहुल गावांमध्ये आजही फुलांचा रंग वापरला जातो. नैसर्गिक असल्याने दुष्परिणाम नाही. उलट, औषधीगुण असल्याने फायदाच होतो.
- विलास दरडे, शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT