यवतमाळ : पोटाचा त्रास होत असल्याने रुग्णाला डॉक्टरांनी यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला. लॉकडाउनमुळे वाहन नसल्याने रुग्णाने पायीच यवतमाळच्या दिशेने प्रवास सुरू केला. दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या रुग्णाला यवतमाळ शहरानजीक एक वाहन येताना दिसले. आपल्याला काही मदत मिळावी, हीच त्याची अपेक्षा. त्या वाहनातून चक्क पोलिस अधीक्षक एम. राजकुमार उतरले आणि रुग्णाची विचारपूस केली. पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचाऱ्यास सदर रुग्णाला वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यास सांगितले.
दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी येथील कृष्णा टोंगळे या व्यक्तीला पोटाचा त्रास असल्याने त्यांनी दिग्रस येथील डॉक्टरला दाखविले. वेदना जास्त असल्याने डॉक्टरांनी यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला. मात्र, लॉकडाउनमुळे कुणाला घराबाहेर पडता येत नाही. वाहतुकीची सर्व साधने बंद आहेत. पोटात तीव्र वेदना होत असल्याने उपाशीपोटीच दोन दिवसांपूर्वी रुग्णाने दिग्रस येथून पायी प्रवासाला सुरुवात केली.
सूर्य आग ओकत असल्याने चालणेही कठीण झाले. मार्गात वाहन दिसल्यास मदतीसाठी हात दाखविला. कुणीही असेल म्हणून दुर्लक्ष केले. उठत... बसत... पाणी पीत... रुग्ण कसाबसा यवतमाळ शहरातील वनवासी मारोती मंदिराजवळ पोहोचला. दरम्यान, त्याला एक वाहन येताना दिसले. रुग्णाने हात दाखवून वाहनाला हात दिला. त्यातून पोलिस अधीक्षक उतरले व रुग्णाला विचारपूस केली.
पेट्रोलिंगवर असलेल्या जगदीश राठोड या कर्मचाऱ्यास थांबवून रुग्णास वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यास सांगितले. तत्पूर्वी, जेवण देण्यास सांगितले. पोलिस अधीक्षक यांच्यातील संवेदना बघून पोलिस कर्मचारी राठोड व रुग्ण टोंगळे दोघेही भावूक झाले. पोलिस कर्मचाऱ्याने रुग्णास भरती केल्यावर आपला मोबाईल क्रमांक दिला आणि काही अडचण असल्यास फोन करण्यास सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.