अमरावती : संततधार पावसामुळे यावर्षी पाण्याची पातळी वाढून वडाळी येथील मुख्य तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. त्यात काही उत्साही सुरक्षेची चिंता न बाळगता येथे पोहायला येतात. अशातच एका पोहता येणाऱ्या व्यक्तीचा तलावाच्या पायरीवरून पाय घसरला अन् टाक्याच्या दिशेने पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. विजय मारोतराव मोरकर (वय ३२) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विजय एका सहकाऱ्यासह वडाळी परिसरातील मुख्य तलावात पोहायला गेला होता. तो पायरीवर आला अन् नकळत त्याचा तोल गेल्यामुळे उंचावरून खाली असलेल्या छोट्या टाक्याच्या दिशेने पडला. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने दहा फूट खोल असलेले खालचे टाके सुद्धा सद्य:स्थितीत पाण्याने भरले आहे.
टाक्याच्या दिशेने पडल्यावर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच तो टाक्यात बुडाला. जखम गंभीर असल्यामुळे त्याला पोहता येत असूनही स्वतःला सावरता आले नाही. जखमी होऊन काही मिनिटांतच त्याचा बुडून मृत्यू झाला. तलावाला लागूनच नागरीवस्ती असल्यामुळे काही युवकांनी बुडालेल्या विजयला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याला बाहेर सुद्धा काढले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. फ्रेजरपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
सुरक्षेचा अभाव
तलाव तुडुंब भरला आहे. असे असताना पोहता येणारे व पोहता न येणारे येथे येत असतात. उंच पायरीवरून वाहणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी चढून काहीजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ही बाब जीवघेणी ठरू शकते. असे असतानाही येथे अशा लोकांना टोकणारे कुणीच नाही.
अनेकांना सेल्फीचा नाद
काही जण ओव्हरफ्लो तलावाच्या पायरीवर चढून सेल्फी काढतात. अशांचाही तोल जाऊन तलावात बुडण्याची भीती अधिक असते. अशा सेल्फिप्रेमींनाही आवर घालण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.