Ashadhi wari 2022 Delhi young photographer completes 21 days Ashadhi Wari  sakal
वारी

विठ्ठलाच्या कळस दर्शनाने गहिवरला राघव

दिल्लीतील छायाचित्रकार तरुणाची २१ दिवस पायी आषाढी वारी पूर्ण

शंकर टेमघरे -सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा असलेली आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पायी करायचीच म्हणून त्याने तब्बल वर्षभर दररोज वीस किलोमीटर चालण्याचा सराव केला. प्रस्थान सोहळ्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात आला. आळंदीपासूनच्या वाटचालीत दररोज अठरा-वीस किलोमीटर वारकऱ्यांसमवेत चालला. कॅमेऱ्यातून वारीतील भाव टिपत गेला. आषाढी दशमीला शनिवारी (ता. ९) पंढरपुरात पोहोचला. चंद्रभागा नदीच्या पात्रापासून पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत दोनशे मीटर हात जोडूनच चालला. संत नामदेवांच्या पायरीचे व मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. वारी पूर्ण झाल्याचे कळताच त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट करून दिली. वारीच्या वाटेवर चालल्याचे सार्थक झाल्याचेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. दिल्लीतील राघव पसरिचा या पंचविशीतील तरुणाची ही कथा.

मूळचा उत्तराखंड राज्यातील सुखवस्तू कुटुंबातील राघव सध्या दिल्लीत राहतो. त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यातच तो करिअर करतोय. वडिलांची फोटोग्राफीची परंपरा त्याने पुढे चालविली आहे. आई रागिणी पसरिचा या बीबीसी मीडिया अॅक्सन मेसज डिजाईनमध्ये संचालिका आहेत. खयाल व ठुमरी गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय गायिका शोभा मुगदल त्याच्या मावशी आहेत. त्यांच्यामुळेच राघवच्या मनात वारकरी संगीताबाबत उत्सुकता होती. त्यासाठी काही रेकॉर्डिंग करणे व वारीतील छायाचित्रे घेण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी तो दिल्लीहून आळंदीत आला. माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा पाहिला. सोहळ्याचे छायाचित्रे घेतली.

वारकरी संगीत, परंपरा व वारीबाबत त्याची उत्सुकता अधिकच वाढली. पालखी पुण्यात मुक्कामी असताना त्याने दिवेघाटाची पाहणी केली. दुसऱ्या दिवशी पालखी दिवे घाटातून जाताना ठरल्यानुसार छायाचित्र घेतली. सासवड, जेजुरी पायी चालत असताना वारीत तो कधी रुळला कळलेच नाही. तो वारकऱ्यांच्या भावमुद्रा टिपत वारीत चालायचा. पालखी तळावर पहाटेची महापूजा टिपली. धावा, उडीचे खेळ, भारुड, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील सात्त्विक व निरागस भाव टिपताना तो वारीमय होऊन गेला.

अश्रूंना मोकळी वाट

पालखी सोहळा वाखरीत मुक्कामी होता. राघव मात्र वारकऱ्यांच्या स्नानासाठी चंद्रभागेत होणारी गर्दी टिपण्यासाठी पहाटे साडेपाचलाच पोचला. बोटीतून अनेक छायाचित्रे काढली. नंतर महाद्वार रस्त्याने मंदिराकडे चालू लागला. घाटाच्या पायऱ्या चढून गेल्यावर ‘आपण विठ्ठल मंदिरासमोर आहोत,’ असे त्याला वारकऱ्यांकडून कळाले. तेव्हा त्याने दोन्ही हात जोडले. फोटोग्राफी थांबली होती. सुमारे दोनशे मीटर हात जोडूनच तो चालत राहिला. संत नामदेव पायरी, चोखामेळा समाधी मंदिर व कळस दर्शन घेतले आता वारी पूर्ण झाल्याचे सहकाऱ्यांनी सांगताच त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट करून दिली. सहकाऱ्यांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट करून देत असताना वारी पूर्ण केल्याचा सात्त्विक भावही त्याच्या चेहऱ्यावर होता.

आळंदीपासून पंढरपूरपर्यंत मी पालखी सोहळ्यात चालत आलो. या वीस दिवसांत राहण्याची, जेवणाची व वारीबाबत मार्गदर्शनाची काळजी अनेकांनी घेतली. या प्रवासात माऊली शब्द दिशादर्शक ठरला.भाषेची अडचण जाणवली नाही. वारी मानवतेची नदी आहे. जी प्रत्येकाची काळजी वाहते. एकीकडे द्वेष व पूर्वग्रह दूषित वातावरण देशात वाढत असताना वारीतील विचार समाजाला दिशादर्शक ठरतील. विठोबा वारकऱ्यांमध्ये आहे, तो वेळोवेळी मदतीच्या रूपाने भेटत राहतो. नजर फाउंडेशन व फ्युजीफिल्म यांनी वारीत येण्यासाठी साहाय्य केले.

- राघव पसरिचा, दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT