Bhagyashri Milind Sakal
वुमेन्स-कॉर्नर

सौंदर्यखणी : भारतीय अभिजात कला ‘पाटण पटोला’

गुजरातमधील पाटण म्हणजे, मध्ययुगीन काळातील चालुक्य साम्राज्याची राजधानी. मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या पाटणमध्ये आजही स्थापत्यशैलीचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात.

रश्मी विनोद सातव

गुजरातमधील पाटण म्हणजे, मध्ययुगीन काळातील चालुक्य साम्राज्याची राजधानी. मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या पाटणमध्ये आजही स्थापत्यशैलीचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात. यातील ‘रानी की बाव’ या विहिरीची, ‘युनेस्कोच्या जागतिक वारसा’ यादीत नोंद करण्यात आली आहे. पाटण, ‘रानी की बाव’बरोबरच पाटणच्या पटोला साडीसाठीसुद्धा जगभर प्रसिद्ध आहे.

पटोला साडीला ‘पटोला-इकत’ साडी असंही म्हणतात. बाराव्या शतकातील चालुक्य साम्राज्यातील सोळंकी घराण्यातील कुमारपाल राजाला इकतची वस्त्रं खूप आवडत असत. तो रोज पूजा करताना इकतचीच वस्त्रं वापरत असे. त्या काळात महाराष्ट्रातील जालना येथे, साळवी समाजाचे विणकर, इकतची वस्त्रं हातमागावर विणत असत. कुमारपाल राजा ती इकतची वस्त्रं जालन्यातील त्या विणकरांकडून मागवीत असे. अशी वस्त्रं पाटणमध्येसुद्धा विणली जावीत म्हणून त्यानं हाराष्ट्रातील ७०० विणकरांना कुटुंबासकट पाटणला स्थलांतरित केलं आणि ‘पटोला-इकत’ला राजाश्रय दिला. तेव्हापासून ती वस्त्रं ‘पाटण-पटोला’ नावानं ओळखली जाऊ लागली.

पाटण-पटोला साडीच्या विणकामाला ‘इकत’ म्हणतात. ‘इकत’ म्हणजे साडीवरील नक्षीकामाची एक खास पद्धत. ‘इकत’ हा प्रकार पाटणच्या पटोला साडीत, ओडिशाच्या संबलपुरी साडीत आणि तेलंगणच्या पोचमपल्ली साडीतसुद्धा असतो. परंतु, पाटणची पटोला साडीच फक्त ‘डबल इकत’ पद्धतीत विणली जाते. ‘पाटण-पटोला’ साडीला नुसतं ‘पटोला’ही म्हणतात.

‘पटोला’ साडी विणतानाच ‘इकत’ डिझाईन साडीवर उतरवलं जातं. ‘डबल इकत’ म्हणजे उभे आणि आडवे दोन्ही धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीनं आधी ‘डाय’ करून घेतले जातात. साडीचे उभे-आडवे धागे हातमागावर लावण्यापूर्वी एका स्टॅन्डवर लावून घेतले जातात. मग सगळ्या धाग्यांवर डिझाइनप्रमाणे खुणा करून घेतल्या जातात. ते धागे नैसर्गिक रंगात बुडवण्यापूर्वी, डिझाइनप्रमाणे जिथं रंग नको असेल तिथं ‘रेझिस्ट’ पद्धतीनं दुसरे दोरे घट्ट बांधून घेतले जातात आणि मग ते सगळे धागे रंगात बुडवले जातात. याला ‘रेझिस्ट डाइंग’ म्हणतात. सगळे धागे वाळले, की मग पहिले बांधलेले दोरे सोडून, डिझाइनप्रमाणे परत खुणा करून दुसरीकडे, जिथं दुसरा रंग नको असेल तिथं पुन्हा दुसरे दोरे बांधून दुसऱ्या रंगात धागे बुडवले जातात. हीच क्रिया डिझाइनमध्ये जितके रंग आहेत, तितक्या वेळा केली जाते. म्हणजे साडीवरचं डिझाईन, विणकाम सुरू करण्यापूर्वीच धाग्यांवर उतरवून घेतलं जातं आणि मग विणकामाला सुरुवात होते. मग ते उभे-आडवे धागे हातमागावर मोजमाप करून अशा पद्धतीनं लावून घेतले जातात, की ठरलेलं डिझाईन साडीवर विणलं जातं. या प्रक्रियेला खूप कुशल विणकर लागतात. एखाद्या टप्प्यावर मोजमापात एक जरी चूक झाली, तरी सगळं डिझाइन चुकू शकतं. क्लिष्ट प्रक्रियेमुळे एक पटोला पूर्ण तयार व्हायला डिझाइननुसार सहा महिने ते वर्षही लागू शकतं. या साड्या महाग असल्यानं सिल्कमध्येच विणल्या जातात.

कुमारपाल राजानं या कलेला राजाश्रय दिल्यानं, त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशपूर्व काळात पाटणमध्ये खास दोन पटोला साड्या विणण्यात आल्या होत्या. कुमारपाल राजानं, त्यांच्या गुरूंनी लिहिलेल्या संस्कृत-व्याकरणाच्या पुस्तकाची हत्तीवर सुंदर अंबारीत ठेऊन मिरवणूक काढली होती. बाराव्या शतकातील या मिरवणुकीचा प्रसंग त्या दोन साड्यांवर ‘डबल इकत’ पद्धतीनं विणण्यात आला होता. त्यापैकी एक साडी सध्या नेदरलँडमधील म्युझियममध्ये असून, एक स्विझर्लंडमधील म्युझियममध्ये आहे. या साड्यांवर भारतात विणला गेलेला हा प्रसंग पाटणमधील ‘पाटण पटोला हेरीटेज’ या म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यासाठी पाटणमधील साळवी कुटुंबानं तसाच अँटिक पीस पुन्हा बनवला आहे. शिल्पगुरू रोहित साळवी, भरत साळवी, विनायक साळवी, राहुल साळवी, सावन साळवी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून भारत सरकारसाठी एक पीस आणि म्युझियममध्ये ठेवण्यासाठी दोन पीस तीन वर्षं काम करून २००३ मध्ये पूर्ण केले. ही अत्यंत किचकट कला अवगत असलेल्या विणकरांची कमाल वाटते. ‘पटोला कले’चे ते अप्रतिम नमुने म्हणजे भारतीय वस्त्रपरंपरेची शान आहे. या कलेचा सन्मान करत जागतिक स्तरावरही ‘युनेस्को’नं ‘इकत’ विणकामाची ‘अभिजात कला’ म्हणून दखल घेतली आहे.

कलेचा समृद्ध वारसा...

  • भारताबरोबरच, इंडोनेशिया, कंबोडिया, म्यानमार, फिलिपिन्स, थायलंड, इराण, लॅटिन अमेरिका, बाली आणि जपानमध्येही असं कापड विणायची कला अवगत आहे. परंतु ‘डबल-इकत’ पद्धतीचा जन्म भारतात झाला असल्याचे पुरावे आहेत. अजिंठामधील लेण्यांमधील चित्रात ‘डबल-इकत’ पद्धतीची वस्त्रं दिसतात.

  • पटोला साडीवरील नक्षीकामात भौमितिक आकार, हत्ती, पोपट, नृत्य करणाऱ्या मुली, पानं-फुलं विणली जातात; पण या ‘मोटीफ्स’ना भौमितीय आकार दिलेला असतो. ‘इकत’ची खूण म्हणजे डिझाईनच्या कडा कधीच गोलाकार नसतात.

  • ‘राणी की बाव’मधील कोरीवकामाचा पटोला साडीवरील नक्षीवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो.

  • पटोलावरील ‘इकत’ डिझाइन विणायच्या आधीच धागे ‘डाय’ केलेले असल्यामुळे, पटोला साडीवरची कोणतीही डिझाइन सुलट आणि उलट बाजूनं सारखीच दिसते.

भाग्यश्रीला मोहात पाडणारी ‘पाटण-पटोला’

‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स मराठी २०२०’ मध्ये, ‘आनंदी गोपाळ’मधील ‘आनंदी जोशी’च्या भूमिकेसाठी ‘क्रिटिक्स ॲवॉर्ड - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ने सन्मानित झालेली भाग्यश्री मिलिंद ही गुणी अभिनेत्री. मुंबईतील ‘डहाणूकर कॉलेज’मध्ये अकरावीत असतानाच तिनं एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ‘बीपी’ या त्यांच्या एकांकिकेला आणि भाग्यश्रीला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं होतं. याच नाटकावरून पुढे ‘बालक पालक’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ऑडिशनमधून, भाग्यश्रीची या चित्रपटासाठीसुद्धा निवड झाली आणि तिच्या सिनेक्षेत्रातील करियरला सुरुवात झाली. कसदार अभिनयामुळे तिच्या सगळ्याच भूमिका उल्लेखनीय ठरल्या.

भाग्यश्रीला, दर्जेदार चित्रपट बघण्याची, नृत्याची आणि भटकंतीची खूप आवड आहे. भटकंतीची आवड असल्यामुळे मनसोक्त फिरण्यासाठी आणि मामाला भेटण्यासाठी ती तिच्या गुजरातमध्ये वापीत राहणाऱ्या मामांकडे नेहमी जात असते. दरवर्षी हिवाळ्यात वापीला एक मोठं प्रदर्शन भरतं. त्यात आजूबाजूच्या गावांमधून हातमागावरच्या साड्या, भरतकाम केलेले गरब्याचे ड्रेस, दुपट्टे, बटवे, हस्तकलेच्या वस्तू आणि बऱ्याच कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी आलेल्या असतात. तीन वर्षांपूर्वी, भाग्यश्री आणि तिची आई मामाकडे गेलेल्या असतानाच ते प्रदर्शन तिथं भरलं होतं. मग भाग्यश्री, तिची आई, तिच्या माम्या आणि इतर बराच मोठा गोतावळा, ते प्रदर्शन बघायला गेला होता. तिथं फिरता फिरता हातामागावरच्या साड्यांच्या स्टॉलवर तिची आई आणि माम्या रेंगाळल्या. फार साड्या न नेसणाऱ्या भाग्यश्रीनं, साड्या विकत घेऊन त्यांचा संग्रह वगैरे करणं असं कधीच केलं नव्हतं.

आनंदीबाई जोशींच्या भूमिकेसाठी आणि फक्त ॲवॉर्ड फंक्शन्सला तिनं आत्तापर्यंत साड्या नेसल्या होता. फार साडी नेसत नसल्यामुळे भाग्यश्री तिथं अजिबात साडी विकत घेणार नव्हती. आई आणि माम्यांची ‘साडी-खरेदी’ बघत ती फक्त तिथं उभी होती. तिला बघून दुकानदार म्हणाला, ‘‘बहेनजी आप भी लेलो ना साडी, देखो यह पाटन की पटोला बहुत सुंदर है, बहुत खिलेगी आपपर, खरीदो मत, बस ड्रेप करके देखो!’’ मग भाग्यश्रीलासुद्धा ती साडी ड्रेप करून बघण्याचा मोह आवरला नाही. त्या दुकानदारानं भाग्यश्रीला ती पाटण-पटोला साडी खूप छान ड्रेप केली. सुंदर जरीच्या काठ-पदराची ती गुलबक्षी-पिंक रंगाची साडी आरशात बघून भाग्यश्री हरखूनच गेली. भाग्यश्री म्हणाली, ‘‘मी फार साड्या नेसत नसले तरी, मला ती हातामागावरची साडी इतकी आवडली, की दोन चारदा नेसल्यानंतर या साडीचा, पटोलाचं विणकाम केलेला डिझायनर घोळदार स्कर्ट शिवून घेता येईल म्हणून मी ताबडतोब ती साडी विकत घेतली!’’

ती पटोला साडी घेऊन आता तीन वर्षं होऊन गेली, तरी ती साडी नेसायचा भाग्यश्रीचा योग काही आला नव्हता; पण या लेखाच्या निमित्तानं तिनं ती साडी आवर्जून नेसून खास फोटो शूट केलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT