Aditi Sarangdhar Sakal
वुमेन्स-कॉर्नर

सौंदर्यखणी : जंगलातील ‘रेशमी ठेवा’

‘टसर सिल्क’ला, ‘जंगली सिल्क’ असेही म्हणतात. संस्कृतमध्ये ‘टसर सिल्क’चा उल्लेख ‘कोसा सिल्क’ असा केला जातो.

रश्मी विनोद सातव

‘टसर सिल्क’ला, ‘जंगली सिल्क’ असेही म्हणतात. संस्कृतमध्ये ‘टसर सिल्क’चा उल्लेख ‘कोसा सिल्क’ असा केला जातो. ‘कोसा’ हा शब्द संस्कृत ‘कसुशेय’ या शब्दापासून तयार झाला असून, ‘कसुशेय’ म्हणजे कोशापासून काढलेले! काही ठराविक जातीच्या रेशमी किड्यांना म्हणजे अंड्यातून बाहेर आलेल्या छोट्या अळ्यांना अर्जुन, साग, साल, जांभूळ, ओक वगैरे जंगलातील झाडांची पानं खायला दिली जातात, महिनाभर या अळ्या पाने खात राहतात आणि खूप मोठ्या होतात मग त्यांना जंगलात झाडांवर नेऊन सोडले जाते, तिथे त्या अळ्या त्यांच्या तोंडातून स्रवणाऱ्या धाग्याने स्वतःभोवती कोश विणतात. कोशाच्या आत त्या अळीचा पतंग होण्याच्या आधीच कोश गोळा केले जातात आणि त्यांचे प्रतवार वर्गीकरण केले जाते. तुटलेले कोश बाजूला केले जातात आणि अखंड कोशांपासून ‘मलबेरी सिल्क’प्रमाणेच ‘टसर सिल्क’चे धागे काढले जातात. फक्त अलीकडच्या काळात मलबेरी सिल्कचा धागा कोशातून काढण्यासाठी काही ठिकाणी मशिनचा वापर होतो आहे; पण ‘टसर सिल्क’चा धागा हातानेच ओढून काढला जातो आणि गुंडाळला जातो.

तुटलेल्या कोशांपासूनही हाताने अगदी निगुतीने सिल्कचे धागे काढले जातात. या धाग्यांना ‘घिचा सिल्क’ म्हणतात. ‘टसर सिल्क’च्या साड्या विणताना, एक ‘टसर’चा आणि एक ‘घिचा’चा धागा पूर्ण साडीत किंवा पदरात टाकून ‘टसर-घिचा’ साड्यांचा एक सुंदर प्रकारही विणला जातो. हे धागे ‘गोल्डन-बेज’ रंगात असतात. नंतर या साड्या वेगवेगळ्या रंगात डाय होतात; पण ओरिजिनल गोल्डन धाग्यात विणलेल्या टसर सिल्कच्या साड्याही खूप लोकप्रिय आहेत. पूर्वी ‘पळसाची फुले’, काही विशिष्ट ‘फुलांमधील परागकण’ किंवा ‘लाख’ यांसारख्या पदार्थांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगात या साड्या रंगवल्या जात असत. टसर सिल्कच्या धाग्यांना रॉ सिल्कच्या धाग्यांपेक्षा तकाकी कमी असली, तरी एक खास टेक्श्चर असते आणि ते टेक्श्चर हीच त्या साड्यांची खासियत ठरते.

हे रेशमी किडे जंगलातील झाडांची पाने खात असल्यामुळे मलबेरी सिल्कपेक्षा टसर सिल्कची किंमत कमी असते. छत्तीसगड आणि बिहारच्या आदिवासी वसाहतींमध्ये खूप वर्षांपासून ‘जंगली कोशां’पासून टसर सिल्कचे धागे बनविण्याचे आणि टसर सिल्कच्या साड्या विणण्याचे काम चालते. देवंगण समाजातील विणकर या साड्या कौशल्याने विणतात. बिहारमधील ‘भागलपुरी टसर सिल्क’ आणि ओडिशातील ‘गोपालपूर टसर सिल्क’ प्रसिद्ध आहे.

प्युअर टसर सिल्क साडीमध्ये उभे आणि आडवे दोन्ही धागे टसरचे असतात, तर ‘कॉटन-टसर सिल्क साडी’मध्ये उभे धागे टसरचे आणि आडवे धागे कॉटनचे असतात. टसर सिल्कच्या साड्यांमध्ये खूप वैविध्य आढळून येते. भागलपूर येथे साड्यांवर हाताने ब्रशच्या साहाय्याने केलेले मधुबनी पेंटिंग, ओडिशामध्ये केलेले इकत आणि पश्चिम बंगालमधील हाताने केलेले ‘कांथा’ आणि ‘मिरर वर्क’ म्हणजे म्हणजे कलेचा एक अप्रतिम नमुना म्हणावे लागेल.

टसर सिल्कविषयी महत्त्वाचे...

  • नैसर्गिक टसर सिल्कचा धागा मायक्रोस्कोपखाली पाहिल्यास नैसर्गिकरीत्या त्यातून बारीक तंतू बाहेर आलेले दिसतात. त्यामुळे धाग्यांच्या फॅब्रिकमधून हवा खेळती राहते आणि म्हणून साडीमध्ये गरम होत नाही. त्यामुळे उष्ण कटिबंधात राहणाऱ्या स्त्रिया टसर सिल्कच्या साड्या आवर्जून नेसतात.

  • ओरिजिनल टसर सिल्क ओळखण्यासाठी त्याचा छोटा धागा जाळून पाहिल्यास त्याची पूर्ण राख होते.

  • टसर सिल्कचा धागा नेहमीच्या सिल्कपेक्षा नाजूक असतो, त्यामुळे या साड्या ‘ड्राय-क्लीन’च कराव्या लागतात आणि कपाटात ठेवताना मऊ सुती कापडात किंवा जुन्या ओढणीत ठेवल्या तर चांगल्या राहतात. या साड्यांच्या घड्याही वर्ष-सहा महिन्यातून बदलाव्यात.

साडीच्या घडीतले आशीर्वाद

‘दामिनी’ मालिकेतून सुरू झालेला आदिती सारंगधरचा यशस्वी प्रवास पुढे अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांपर्यंत झाला. ती अभिनयाइतकंच इतर कलांवरही मनापासून प्रेम करते. साडी विणण्याच्या कलेचंसुद्धा तिला खूप कुतूहल वाटतं आणि निरनिराळ्या विणींच्या साड्या ती आवर्जून नेसत असते. आदिती म्हणाली, ‘‘मला दाक्षिणात्य साड्या खूप आवडतात. माझ्या लग्नातल्या सगळ्या साड्या प्युअर कांजीवरम होत्या; पण महाग किंवा भारी ब्रँडच्याच साड्या मी नेसते असं अजिबात नाही. मी कमी किमतीच्या साड्याही भरपूर घेत असते. साड्या नेसायला मला जाम आवडतात. साडी हा माझा ‘कम्फर्ट झोन’ आहे!’’ आदितीच्या कपाटातील तिच्या कांजीवरम आणि इतर अनेक साड्यांच्या गठ्ठ्यातील एक साडी आदितीसाठी खूप खास आहे.

सात-आठ वर्षांपूर्वी चिपळूणजवळील डेरवण गावी नऊरात्रानिमित्त ‘स्त्री शक्ती जागर’च्या कार्यक्रमाला आदितीला ‘सेलिब्रेटी गेस्ट’ म्हणून आमंत्रित केलं होतं. मुंबईतील एका ‘स्वामी समर्थ मठा’चं काम बघणाऱ्या एका काकांनी आदितीला ते निमंत्रण दिलं होतं. डेरवण येथील ‘स्वामी समर्थ मठ ट्रस्ट’च्या हॉस्पिटलमधील परिचारिका आणि त्यांच्या मुलांसाठी तो कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम संपल्यावर त्या काकांनी आदितीसाठी निरोप आणला- त्या मठाच्या मुख्य गुरुजींनी आदितीला परतण्यापूर्वी भेटायला बोलावलं होतं. आदिती काही परिचारिकांसोबत त्या गुरुजींना भेटायला त्या टुमदार मठात गेली. त्या गुरुजींनी तिचं स्वागत करून आदरतिथ्य म्हणून मठातली कॉफी दिली. ते गुरुजी उच्चशिक्षित होते, त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेऊनसुद्धा मानवजातीच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. ते गुरुजी आदितीशी, त्या मठाबद्दल, ‘महिला सबलीकरणा’बद्दल आणि डेरवणसारख्या छोट्याशा गावात असलेल्या त्या अद्ययावत हॉस्पिटलविषयी भरभरून बोलत होते. भेटीची वेळ संपली आणि आदिती निघाली... गुरुजींनी तिला थांबवलं आणि ‘‘थांब बाळ... ही घे छोटीशी भेट... स्वामींचा आशीर्वाद समज!..’’ असं म्हणत तिच्या हातात एक साडी ठेवली. आदिती त्यांच्या पाया पडली आणि साडीच्या घडीतले ते आशीर्वाद घेऊन भारावलेल्या मनानं घरी निघाली. मुंबईच्या ज्या काकांनी तिला डेरवणला नेलं होतं ते म्हणाले, ‘‘गुरुजी फार कुणाला भेटत नाहीत आणि फार कुणाशी बोलतही नाहीत. तुझ्याशी इतका वेळ बोलले, तुला आशीर्वाद दिले, भाग्यवान आणि ‘प्युअर सोल’ आहेस तू. ही साडी आवर्जून नेस हो...!’’

डेरवणहून आल्यानंतर लगेचच आदिती ‘मिफ्ता ॲवॉर्ड्‌स’साठी ऑस्ट्रेलियाला गेली आणि ‘मिफ्ता’ संपल्यानंतर तिचा नवरा - सुहास ऑस्ट्रेलियाला गेला आणि तिथून ते दोघं ऑस्ट्रेलिया फिरायला गेलं. इतक्यात बाळ नको म्हणणाऱ्या दोघांनाही आल्यावर ‘गुड न्यूज’ मिळाली. ती बातमी सांगण्यासाठी तिनं मुंबईच्या त्या काकांना फोन केला; पण तिला कळलं, की त्यांचं नुकतंच निधन झालं. नंतर ‘प्रेग्नन्सी’ आणि इतर व्यग्र शेड्युलमुळे ती साडी नेसण्याचा योग लवकर जुळून आला नाही. मग आदितीनं ती साडी आणि ते आशीर्वाद गाठोड्यात अनेक वर्षं जपून ठेवले.

या लेखाच्या निमित्तानं आदितीच्या त्या साडीच्या जपून ठेवलेल्या आठवणी जाग्या झाल्या आणि खास या लेखासाठी तिनं त्या सुंदर साडीची घडी मोडली आणि शूटिंगच्या ‘सेट’वरच फोटो शूट केलं.

आदितीच्या कपाटात तिच्या कामाचं कौतुक म्हणून मिळालेल्या अनेक साड्या आहेत; पण आशीर्वाद गुंफलेली ती साडी खूपच खास आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT