आवळाई गाव दुष्काळी आहे; पण गावातील माणसे अमृताहुनी गोड, मायाळू स्वभावाची, सहकार्याची, सत्कार्याचे प्रतीक आहेत.
- सुशीला धारणे, नवी सांगवी, पुणे
प्रत्येक स्त्रीला माहेराची ओढ असतेच. आटपाडी तालुक्यातील, सांगली जिल्हातील बाराही महिने दुष्काळाच्या छायेत असलेले, मरीमातेच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेले, ‘मरीमातेची आवळाई’ म्हणून ओळख असलेले आवळाई हे गाव हे माझे माहेर!
आवळाई गाव दुष्काळी आहे; पण गावातील माणसे अमृताहुनी गोड, मायाळू स्वभावाची, सहकार्याची, सत्कार्याचे प्रतीक आहेत. शेती ओसाड, नापीक पडिक असल्यामुळे सोने-चांदी आटणीचा व्यवसाय आणि दुधाचा धंदा करून गावाचे गोकुळ बनविले आहे. मरीमातेची पालखी, पूजा, चोळी-पातळ, मानाचा विडा, संप्ता, उत्सव करण्याचा मान आमच्या साळुंखे-पाटील देशमुख घराण्याकडे आहे. मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला मरीमातेची मोठी यात्रा भरते. जुन्या शाळकरी कलावती, रतन, मंगल, सविता इत्यादी मैत्रिणी आवर्जून भेटतात व जुन्या आठवणींच्या डायरीतील ‘स्मृतिचित्रे’ डोळ्यांसमोर उभी राहतात.
आवळाईतील आमचे घर ‘साळुंखे- पाटील वाडा’ या नावाने ओळखले जाते. माझे बालपणही याच वाड्यात गेले. आमच्या घरात, आई-वडील, आम्ही चार बहिणी, दोन चुलते, त्यांची मुले व मुली, आमची आत्या असा एकूण २०-२५ जणांचा परिवार होता. जेवताना पंगत ओसरीवर बसायची.
संपूर्ण वाड्यात माझ्या आजीचा दरारा असायचा. तिचा प्रत्येक निर्णय सुप्रीम कोर्टासारखा होता. माझी आई अतिशय धार्मिक, प्रेमळ, मायाळू, सुगरण होती. ती साक्षात अन्नपूर्णा होती. त्यामुळे माहेरी आल्यावर खाण्याची रेलचेल होती.
घर धान्यांच्या कणगींनी भरले होते. म्हशी, शेळ्या-मेंढ्या, खिलारी बैल होते. दूध, दही, तूप, लोणी ओसंडून वाहत होते. चहा माहीत नव्हता, प्रत्येकाने दूध पिल्याशिवाय बाहेर जायचे नाही, असा नियम होता. अगदी गोकुळात असल्यासारखे वातावरण होते; पण काही घटना घडल्या आणि आम्हाला घराबाहेर पडावे लागले.
माझे वडील सांगली जिल्हा परिषद शाळेमध्ये हाडाचे शिक्षक, आदर्श हेडमास्तर होते. त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यत पहिलीच्याच वर्गाला शिकविले- कारण शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा म्हणून. वडील अत्यंत परोपकारी, दयाळू, मायाळू, भोळ्या स्वभावाचे. सदैव दुसऱ्यासाठीच उपयोगी पडायचे. असा परोपकारी भला माणूस ‘संत बाबा गुरुजी’ म्हणून सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध होते. वडील आदर्श हेडमास्तर असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. ते बदलीच्या गावी आम्हाला घेऊन आले. वडिलांची बदली राजेवाडी, दिघंची, कौठुळी, देवनगर आणि महाकवी गदिमांचे ‘माडगुळे’ इत्यादी ठिकाणी झाली. ग. दि. माडगूळकरांना शिक्षकांबद्दल खूप आदर होता. त्यांच्या वाड्यात आम्ही भाडेकरू होतो. गदिमांचा सहवास लाभला. खूप चांगले संस्कार करून मार्गदर्शन केले.
माझे वडील पांडुरंगाचे परम भक्त होते. ते दर महिन्याच्या एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारी करीत होते. म्हणून आई- आम्ही चार मुली शिक्षणासाठी पंढरपूरला धुंडामहाराज देगलूरकर यांच्या मठात खोली भाड्याने घेतली आणि शिक्षणाची वारी सुरू केली. शिक्षण पूर्ण झाले पुढे काय?
माझ्या आयुष्याचे परिवर्तन करणारी एक घटना घडली. आईने चौथ्या मुलीला जन्म देताना त्या काळात खेडेगावात नर्स, डॉक्टर, सुईण कोणीही धावून आले नाही. आईने सहन केलेल्या कळा आणि जीवघेण्या वेदना, माझ्या हृदयाला जाऊन मिडल्या होत्या. त्याचवेळी मी भीष्मप्रतिज्ञा केली, ‘मी आदर्श नर्स होणार.’ पुढे मी ‘स्पेशल बाल संगोपन, माता-बाल संगोपनाचा अभ्यास करून, सोलापूर, कोल्हापूर, पुणे (ससून), मुंबई इत्यादी ठिकाणी जाऊन माझी समाजसेवा पूर्ण केली. आता नोकरीनिमित्ताने मी पुण्यात स्थायिक झाले. ज्यांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली ते आई-वडील माझ्या माहेरचे दोन देव, माझे वैभव पाहण्यासाठी या जगात नाहीत.
माझे वडील पंढरीच्या पांडुरंगाला नेहमी सांगायचे, ‘बरे झाले देवा, मला मुलगा नाही दिला. मी माझ्या मुलींना मुलगा समजून त्यांच्यावर सुसंस्कार करून, सुयोग्य शिक्षण देऊन, त्यांना त्यांच्या पायावर उभं करून, मुलींचा तिरस्कार करणाऱ्या समाजाला सांगीन, की वंशाच्या दिव्यापेक्षा अंधारात प्रकाश देणारी, पणतीच श्रेष्ठ असते.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.