Medicines google
युथ्स-कॉर्नर

औषधनिर्माता एक विश्वासार्ह दुवा

टीम YIN युवा

डॉ. विजय अ. जगताप

मित्रांनो २५ सप्टेंबर हा दिवस “जागतिक औषधनिर्माता (फार्मासिस्ट) दिवस” म्हणून उत्सवाने साजरा करण्याचा दिवस आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील एक महत्वाचा दुवा फार्मासिस्ट होय. औषधे खरेदी करताना सर्वसामान्य लोक एक फार्मासिस्ट म्हणून जो काही विश्वास दर्शवितात, तो व प्रतिमा जपणे, व सचोटीने व्यवसाय करणे हेच एका आदर्श फार्मासिस्टचे कर्तव्य आहे. कोव्हिडच्या सद्य स्थितीतील काळात फार्मासिस्टने हे जाणीवपूर्वक जपलेले आहे. यामुळेच त्यांच्या कठोर परिश्रम आणि समाजातील योगदान ओळखण्याची आवश्यकता निर्माण होते. याच संकल्पनेवर जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने हा लेख.........

एफआयपी म्हणजेच आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण महासंघ याची स्थापना

२५ सप्टेंबर १९१२ रोजी झाली. फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स आणि फार्मास्युटिकल शिक्षणाचे प्रतिनिधित्व करणारी ही एक जागतिक संस्था आहे. त्यांच्या १४४ राष्ट्रीय संस्था, तसेच शैक्षणिक संस्थाचे सदस्य आणि वैयक्तिक सदस्यांच्या माध्यमातून, ते जगभरातील लाखो फार्मासिस्ट, फार्मास्युटिकल शास्त्रज्ञ आणि फार्मास्युटिकल शिक्षकांचे प्रतिनिधित्व करतात. एफआयपी ही एक अशासकीय संस्था आहे. ज्याचे मुख्य कार्यालय नेदरलँड्समध्ये आहे. त्यांच्या भागधारकांमार्फत, ते फार्मसी क्षेत्राच्या विकासासाठी, उदयोन्मुख वैज्ञानिक नवकल्पनांद्वारे आणि जगातील आरोग्य सेवेच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन अहोरात्र कार्य करते.

एफआयपी परिषद, इस्तंबूल २००९ रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनाची कल्पना उदयास आली. जगात ७८% फार्मासिस्ट तज्ञ या महिला आहेत. २०१८ च्या वार्षिक अहवालनुसार एक हजार बिलीयन यूएस डॉलरच्या वर या क्षेत्राचा जागतिक महसूल आहे. पेनीसिलीन संशोधक अलेक्सांडर फ्लेमिंग व चक्क म्हणजे कोकाकोला संशोधक जॉन पेंबेरेटण हे जगविख्यात फार्मासिस्ट आहेत. या वर्षी अकरावा जागतिक फार्मासिस्ट दिन आहे. आजपर्यंत ४० लाखांहून अधिक फार्मासिस्ट जगात कार्यरत आहेत. “फार्मसी: आपल्या आरोग्यासाठी नेहमीच विश्वासार्ह” ही या वर्षाची संकल्पना (थीम) आहे. अनेक वर्षांपासून केल्या गेलेल्या, राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये पहिल्या पाच सर्वात विश्वासार्ह व्यावसायिकांमध्ये शिक्षक, शास्रज्ञ या बरोबर फार्मासिस्टचे नाव सातत्याने घेतले जाते. हे जगातील सर्वात विश्वासू लोक आहेत. सकारात्मक सबंध, योग्यता / कौशल्य आणि सातत्य या तीन गोष्टींमुळे फार्मासिस्ट नाव या सर्वेक्षणांमध्ये येते.

सध्याचे एफआयपीचे अध्यक्ष श्री. डोमिनिक जॉर्डन यांच्या मते “विश्वास हा सर्व मानवी संबंधांचा मध्यवर्ती भाग आहे आणि सामाजिकतेचा मूलभूत घटक आहे. आरोग्य सेवेसाठी विश्वास देखील आवश्यक आहे. आरोग्यसेवा व्यावसायिकांवरील विश्वास आणि त्यामुळे रुग्णांवर होणारे आरोग्य परिणाम यांच्यात एक महत्त्वपूर्ण संबंध आहे. आरोग्य क्षेत्रात असे आढळते की, रुग्णांना फक्त औषधांमुळे फरक न पडता तितक्याच प्रखरतेने विश्वास, प्रेम व आपुलकी दाखविल्यास त्यांचे आरोग्य जीवनशैलीत कमालीने बदलते.” हेच दाखविण्याचा एफआइपीचा या वर्षी उद्देश आहे.

या करीता फार्मासिस्टने समाजासोबत संवाद साधावयास हवा व समाजातील लोकांना निरोगी जीवनाचा सल्ला देण्यासह, रोगापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे आणि औषधे योग्य प्रकारे खात्री करून घेवून याद्वारे रोगांचे चांगले व्यवस्थापन व रुग्णांची जीवन शैली बदलण्यास प्रवृत्त करणे हे उद्दीष्ट ठेवायला हवे. यासह विविध आरोग्य सेवांद्वारे आरोग्य कसे बदलत आहेत, सुरक्षित व प्रभावी औषधे आणि लसींचा विकास करून लोकांचे जीवन कसे बदलवून आयुष्य प्रदीर्घ करत आहेत तसेच औषधनिर्माण शिक्षणाच्या क्षेत्रात फार्मसी शिक्षक आपल्या समाजात वाढत्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे पात्र आणि सक्षम फार्मासिस्ट आणि वैज्ञानिक कसे घडवित आहेत यावर जागरूकता निर्माण करायला हवे.

फार्मासिस्ट्स हा नेहमी दिवसरात्र कठोर परिश्रम करून समाजाला निरोगी ठेवण्याचे काम करत असतो. यापैकी बहुतेक फार्मासिस्ट्स हे नेहमी पडद्यामागे शांतपणे काम करतात, यामुळेच त्यांच्या कठोर परिश्रम आणि समाजातील योगदान ओळखण्याची आवश्यकता निर्माण होते. बहुतेक लोक फार्मासिस्ट्सने पुरविलेल्या सेवांच्या संख्येपासून अनोळखी आहेत आणि त्यांना फक्त औषधे वितरीत करणार्‍या व्यक्ती म्हणून ओळखतात. भारतात सुद्धा, फार्मेसी कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच पी. सी. आई. फार्मासिस्टला आजच्या या दिवसाचा वापर देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात आरोग्य सुधारण्यासाठी तसेच फार्मासिस्टच्या भूमिकेस प्रोत्साहन देणारी व जाहिरात करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहित करते.

फार्मासिस्ट्सचे विस्तृत कौशल्य हे नेहमी रुग्णाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी वापरली जातात. हे कौशल्य विज्ञान आणि संशोधनाद्वारे पुढील पिढीला शिक्षित करून तसेच रूग्णांच्या गरजा सेवांमध्ये रुपांतरित करून वापरले जाते. फार्मासिस्ट्स हा ज्ञान आणि सल्ला याचा विश्वासार्ह स्त्रोत आहेत, तो केवळ रुग्णांसाठी नव्हे तर इतर आरोग्य सेवा यांच्यासारख्या व्यावसायिकांना देखील निस्वार्थपाने सतत ज्ञान देण्याचे काम करतो. फार्मासिस्ट हा नेहमी त्याच्याकडे म्हणजेच औषधलयामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्ण याचे औषधी, प्रमाण तसेच पद्धती या सुनिश्चित करतात तसेच योग्य औषध योग्य डोस आणि सर्वात योग्य पद्धत पुरविण्याचे काम करतात. फार्मासिस्ट इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत काम करतात जेणेकरुन प्रत्येक व्यक्तीला इष्टतम उपचार मिळतील तसेच जगभरातील सर्वात सुलभ आरोग्य सेवा व्यावसायिकांपैकी एक म्हणून, फार्मासिस्ट आरोग्य राखण्यासाठी आणि आजारास प्रतिबंध करण्यासाठी त्यांचे शिक्षण वापरतात. फार्मासिस्ट्स हे विविध ठिकाणी तज्ञ म्हणून करतात जसे संशोधन आणि विकास, औषधी निर्माता, शिक्षण व समर्थन, आरोग्यसेवा मदतनीस, कायदा व नियम, प्राथमिक आणि समुदाय आरोग्य, वितरण ई.

आजकाल भारत देशात फार्मसी शिक्षणाचा दर्जा उंचवलेला आहे. जिथे फार्मासिस्ट् फक्त दुकानदार न राहता औषध- आहार समुपदेशन, प्राथमिक उपचार, रक्तगत, रक्तदाब, मूलभूत चयपचय दर तपासणे, व्यसन मुक्तीसाठी मार्गदर्शन, विविध आरोग्य क्षेत्राशी निगडीत राष्ट्रीय अथवा जागतिक दिन साजरा करून जागरूकता निर्माण करणे अशा अनेक विविध सेवा तो उत्तम मार्गदर्शक व मित्र म्हणून तो देतो. आरोग्य व्यवस्थेवरील भार हलका करण्यासाठी व सामाजिक आरोग्यात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी फार्मासिस्ट् येणार्‍या काळात मोलाची मदत करू शकेल. कोव्हिडच्या महामारीत सुद्धा कोव्हिड चाचणी घेण्यासाठी तसेच लसीकरणाच्या वाढीसाठी सुद्धा फार्मासिस्ट्चा विचार केला जाऊ शकतो. अर्थात यात परिपूर्ण धोरण आखण्याची गरज आहे. ग्राहकांनीही दुकानांतील फार्मासिस्टच्या उपस्थितीसाठी व त्याच्या रुग्णभिमुख कामासाठी आग्रही होणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ कायदा सांगतो म्हणून नव्हे, तर सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक म्हणून फार्मासिस्टकडे व फार्मसी प्रॅक्टिसकडे ब​घितले गेले पाहिजे.

आज मी सुद्धा फार्मासिस्ट म्हणून या लेखाद्वारे आपणा सर्वांना निरोगी होण्यासाठी मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्याचे आवाहन करतो व सांगू इच्छितो की स्व:ताचा स्वीकार करा, आयुष्यातील उद्दिष्ट्ये ओळखा, नियोजन आणि समन्वय साधून काम करा, स्वतःचा विकास सांभाळताना सामाजिक संतुलन साधा, स्वयंपूर्णतेने स्वाभिमान वाढीस लावा, नातेसंबंधातील नियोजनाबरोबर आर्थिक नियोजन टिकवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाधानाचा निर्देशांक ठरवा. सु:खी अथवा दु:खी न राहता आनंदी राहावयास शिका. अध्यात्माची कास धरून यम व नियम येणार्‍या पिढीस ओळखवयास शिकवा. खरे तर हे सर्वांमध्ये असते फक्त अनुभूतीची गरज असते. हे सगळे निकष स्वतःला लावून पाहिले तर आपण कुठे कमी आहोत आणि कुठे सुधारणा गरजेच्या आहेत याची जाणीव होईल. त्यादृष्टीने सतत प्रयत्न करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपल्या मनाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे.

एकंदरीतच काय जगण्याची गुणवत्ता फक्त निरोगी शरीरावर नव्हे, तर निरोगी मनावरसुद्धा अवलंबून असते. कोणत्याही शारीरिक व्याधीचा उगम मानसिक अस्वस्थतेतून होतो. “आज जरा बरे वाटत नाही आहे”, असे वाटते तेव्हा ते शरीराचे दुखणे आहे की मनाचे, हे ओळखता यायला हवे. चिकित्सक, निदान, फार्मासिस्ट, औषधी, उपचार या सर्व नंतरच्या बाबी आहेत. म्हणूनच वैदकीय क्षेत्रात “खबरदारी ही उपचारपेक्षा बरी” या उक्तीला खूप महत्व आहे.

माझ्यामते प्रत्येक फार्मासिस्ट या विषयांवर अधिक चांगले समुपदेशन समाजाला करू शकतात. पण ही एक जबाबदारी म्हणून त्यांनी ती घेतली पाहिजे ज्याने सर्व समाज निरोगी होईल. व ज्याने समाजाचा फार्मासिस्टवरील विश्वास अजून जास्तपणे द्रूढ होईल. व त्यामुळेच खर्‍या अर्थाने जागतिक फार्मासिस्ट दिनाची या वर्षातील संकल्पना सार्थकी लागेल असे मला वाटते.

सर्वांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

डॉ. विजय अ. जगताप

(एम. फार्म. पी. एच. डी)

प्राचार्य, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी,

सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT