आपणा भारतीयांची एक गंमत अशीये, की एका कॅलेंडर वर्षांत किमान आठ-दहा वेळा आपण ‘नवं वर्षं’ साजरं करतो! म्हणजे परवा आपण मराठी लोकांनी उत्साहानं 'गुढी पाडवा' साजरा केला. त्याच दिवशी तेलगू आणि कानडी लोकांनी ‘उगडी’ साजरा केला असेल. पुढच्या महिन्यात पंजाब आणि बहुसंख्य उत्तर भारतात ‘बैसाखी’ हा नववर्ष दिवस साजरा होईल. तोच बंगाल आणि पूर्व भारतात ‘बोहेला बौशाख' नावानं साजरा होईल तर तमिळनाडूत ‘पुथंडू’ म्हणून! पुढे दिवाळीत आपले गुजराथी-मारवाडी बांधव बलिप्रतिपदेला ‘विक्रम संवत’चा नववर्ष दिवस साजरा करतील.
‘गुढी पाडवा’ किंवा चैत्र प्रतिपदा हा ‘हिंदू’ नववर्षाचा दिवस आहे, असा एक मोठा समज सोशल मीडियावर पसरलेला दिसतो. पण पाडवा जसा ‘हिंदू नववर्ष’ दिवस आहे, तसेच उगडी, बैसाखी, पुथंडू, बलिप्रतिपदा हेही हिंदू नववर्ष दिवसच आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या हिंदू परंपरांमधलेच ते आहेत! हे सगळेच आपण आपापल्या प्रदेशांमध्ये साजरे करतो! ह्या इतक्या नववर्षांसोबत आपण पारशी लोकांचा ‘नवरोझ’ साजरा करत नाही, पण त्या दिवशी बॅंका बंद ठेवतो आणि ख्रिश्चनांच्या ‘थर्टी फस्ट’ला सुट्टी घेत नाही पण तो जोरदार साजरा करतो!
आपण फक्त एकच 'नववर्ष दिन' साजरा करत नाही. किंबहुना, तो कधी येतो कधी जातो तेही आपल्याला माहीत नसतं. तो म्हणजे भारताचं अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर, ‘भारतीय सौर वर्षाचा’ पहिला दिवस! गेल्याच महिन्यात २१ मार्चला भारतीय सौर वर्षाचं नववर्षं सुरू झालं पण ते आपल्या गावीही नव्हतं. भारतीय सौर वर्षाला आपण आपलं ‘राष्ट्रीय’ कॅलेंडर म्हणून स्वीकारून ६४ वर्षं पूर्ण होऊन गेलीत, पण दरवर्षी तो सुरू झाल्याची चतकोरभर बातमीही कुठेही येत नाही अन् कोणी कुठल्या गल्लीत तो साजरा करतानाही दिसत नाही. अर्थात, गेल्या चौसष्ठ वर्षांत ‘आकाशवाणी’ सोडलं तर इतर कुठेही कोणीही भारतीय सौर वर्षाचं कॅलेंडर वापरतानाही दिसत नाही! हे असं काहीतरी आहे हे कधीतरी आपण शाळेत शिकलेलं असतं, पण आयुष्यातलं ‘मार्क्स'वादासाठीचं शिक्षण संपलं की ते विसरून गेलेलं असतं!
खरंतर, सध्याच्या या सदैव ऑनलाइन असलेल्या, अनेक संस्कृत्यांची सरमिसळ झालेल्या आणि ग्लोबली कनेक्टेड असलेल्या जगात कोणती कॅलेंडर मानायची आणि पाळायची हा एक मोठा प्रश्नच आहे. सोय आणि सवय म्हणून आपण सगळेच ‘इसवी सन’वालं म्हणजे ग्रेगॉरियन कॅलेंडर रोजच्या आयुष्यात वापरतो. सांस्कृतिक ठेवा म्हणून शकं आणि संवत्सरंही पाळतो, निदान त्यातले महत्त्वाचे दिवस तरी. उद्या सरकारनं आग्रह केला, तर कदाचित भारतीय राष्ट्रीय सौर वर्षंही साजरं करायला लागू!
साजरं करणं आपल्याला आवडतं, निमित्त कोणतंही असो!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.