पुणे : एखादा मोठा स्टार किंवा सेलिब्रिटी घेऊन व्यवसायाची किंवा उत्पादनाची जाहिरात करण्यापेक्षा आपले उत्पादन जर चांगले असेल आणि त्यामागील हेतू जर योग्य असेल तर ग्राहकांचा विश्वास निश्चितच बसतो. या विश्वासार्हतेतूनच आपण जे उत्पादन तयार करीत आहे ते उत्पादन हेच आपले ब्रँड बनते, असे मत कैलास जीवन आयुर्वेद संशोधनालय पुणे चे व्यवस्थापकीय संचालक परेश कोल्हटकर यांनी व्यक्त केले.
मएसो सिनियर कॉलेजच्या स्टार्टअप इनोवेशन सेल, डिक्की नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 'उद्यमी संवाद - 'कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा' या विशेष मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड मधील मएसो सभागृहात हा कार्यक्रम झाला.
परेश कोल्हटकर यांनी कैलास जीवन आयुर्वेद संशोधनालय या उद्योगाची यशोगाथा मांडली. म ए सो नियामक मंडळाचे सदस्य सीए राहुल मिरासदार, डॉ दिलीप शेठ, श्री विजय भालेराव, म.ए.सो.सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते. वैचारिक किडा युट्युब चॅनलचे सर्वेश देशपांडे यांनी यावेळी मुलाखत घेतली.
परेश कोल्हटकर म्हणाले, तरुण असताना उमेदीच्या काळामध्ये थेट व्यवसायामध्ये प्रवेश करण्यापेक्षा त्या अगोदर तरुणांनी ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे त्याच क्षेत्रात जर नोकरी केली तर स्वतःमधील अहंभाव दूर होतो त्यातील अडथळे व संधी माहीत होतात आणि आपल्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी कसे वागले पाहिजे याची माहिती मिळते आणि त्यातूनच आपला व्यवसाय मोठा करण्यामध्ये मदत होते.
फक्त पैसे मिळवणे हा व्यवसायाचा मूळ हेतू असू नये आपण जर चांगले काम करत राहिलो तर त्यातून आपली आर्थिक भरभराट निश्चित होते परंतु जर आपण पैसा हाच उद्देश ठेवला तर चांगले काम आपल्या हातून होत नाही.
उत्पादनामध्ये जर गुणवत्ता असेल तर त्याची फारशी जाहिरात न करताही ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कैलास जीवन हे आहे.
सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे आणि हमखास उपाय असणारे कैलास जीवन वापरल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींपासून ते भारताबाहेर अमेरिका, रशियामधील नागरिकही कैलास जीवन वर विश्वास ठेवतात. हाच विश्वास आम्ही एक व्यावसायिक म्हणून कमावलेला आहे. त्यातूनच आम्ही कैलास जीवन हा ब्रँड निर्माण करू शकलो, अशी भावना परेश कोल्हटकर यांनी यावेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.