साक्षी राऊत
Mobile Addiction : दूध पित नाही, जेवण करीत नाही म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाईल देवून जबाबदारी आईवडील जबाबदारी टाळताना दिसत असले तरी येणाऱ्या काळात त्याचे दुष्परिणाम दिसतात. मोबाईलच्या आहारी गेल्याने याचा परिणाम मुलांच्या निकोप वाढीवर होतो. मानसिक विकारही जडण्याची शक्यता असते.
मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखाली घासही जात नाही. जेवण करावे म्हणून पालकही त्यांच्या हातात मोबाईल देतात. दोन रट्टे देऊन अथवा समजावून न सांगता ते जे मागतील ते सहज उपलब्ध करून देण्याची पालकांची वृत्ती भविष्यात घातक सिद्ध होऊ शकते. हजारो मुलांना मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराबरोबर अनेक विकार जडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मोबाईलचा प्रमाणापेक्षा जास्त वापर मुलांच्या निकोप वाढीसाठी घातक ठरत आहे. मुले बाहेर जाऊन मित्रांसमवेत खेळण्याऐवजी खोलीत मोबाईलसोबत तासनतास वेळ घालवितात. यामुळे हे समाजात मिसळत नाहीत. त्यांना हक्काचे मित्र नसतात. पुढे चालून ते एकतर लाजरेबुजरे होतात अथवा अतिआक्रमक.
त्यांच्यात सांघिकतेचा अभाव असतो. प्रत्यक्ष जीवन जगताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यात ते अपयशी ठरतात. मित्र तर सोडाच पण त्यांना जवळच्या नातेवाईकांबाबतही आदरभाव अथवा प्रेम निर्माण होत नाही. वास्तविक पाहता ही एक मानसिक जडणघडण आहे. मनुष्याचा स्वभाव हा परिस्थितीनुसार आकार घेत असतो. मोबाईलच्या नादात आपला मुलगा अथवा मुलगी एकटे पडत आहे, याची जाणीव आईवडिलांना होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. (Mobile Addiction)
आधुनिक तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम अनेक पालकांना माहीत असूनही ते आपल्या मुलांना मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढू शकत नाहीत. बालपणी केलेले दुर्लक्ष पालकांना भोवणारे असते. केवळ कौतुक म्हणून मोबाईल देणे चुकीचे आहे. यामुळे एकलकोंडेपणा वाढल्याने त्याचे सामाजिक दुष्परिणाम होण्याची भीती असते. यासाठी मुलांपेक्षा पालकच अधिक जबाबदार ठरणार आहेत. (ChildCare)
मोबाईल आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. मुलांसमोर पालकच जर सतत मोबाईलवर राहिले तर त्याचं अनुकरण मुलंही करतात. त्यामुळे जेवताना, झोपताना, बाहेर खेळताना कटाक्षाने मोबाईलचा वापर टाळावा. केव्हा आणि कितीवेळ मोबाईल हातात द्यावा, हेही निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच ‘माझा मुलगा गेमिंगमध्ये फारच एक्स्पर्ट आहे’ असे कौतुक करणे टाळले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.