प्रशांत घाडगे
साताऱ्यातील संग्रहालयात शिवकालीन १७ व १८ व्या शतकातील शस्त्रास्त्रे व ऐतिहासिक वस्तूंचा घेतलेला आढावा..
छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतरच्या काळात अनेक लढायांमध्ये दांडपट्टा वापरण्यात आला होता. पट्ट्याचे पाते पोलादी व खोबळा लोखंडी आहे. खोबळ्यावर सोन्याचे पाणी चढविलेले असून, संपूर्ण पृष्ठभागावर भौमितिक आकार आणि पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. याची लांबी १३२ सेंटीमीटर असून, वजन एक किलो नऊ ग्रॅम आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा आणि हाताचा ठसा.
किवकीची पाटीलकी मल्हारजी निगडे देशमुख यांची असता ती हिरोजी इंदलकर यांना विकली. ती पुन्हा निगडे देशमुख यांच्या स्वाधीन करण्याबाबत बालाजी कुकाजीप्रभू हवालदार व कारकून यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मीळ पत्र.
कट्यार पोलादाची बनविलेली असून, संपूर्ण मुठीवर सोन्याचे पाणी चढविलेले आहे. कट्यारीच्या नखेवर दोन्ही बाजूने संस्कृतमध्ये तीन ओळी लिहिलेल्या आहेत. कट्यारीला निळ्या रंगाचे लाकडी म्यान असून, सिंहमुद्रा व चांदीचे मुहनाल आहे. शिवरायांच्या काळात कट्यार अंगाशी बाळगले जात होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी चिलखत वापरले जात होते.
दख्खन व मराठा शैलीच्या मिश्रणातून खंडा तलवार बनविलेली आहे. खंड्याची मूठ नायर व दक्षिणी घाटाची आहे. मुठीच्या कटोरीवर काही ठिकाणी कुंकवाचे अवशेष आहेत. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरात विधींसाठी वापरली जात होती.
हा भाला शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आला असून, एकूण लांबी १०८ सेंटीमीटर आहे. वजन ८०० ग्रॅम असून, भाल्याचे पाते आणि दंड लाकडी आहे. भाल्याची गर्दन पितळी व नक्षीदार आहे.
शिवरायांच्या काळात अंगाशी बाळगण्यात येणारे शस्त्र.
मोगलांशी झालेल्या युद्धाप्रसंगी खजिन्यावर ताण पडू नये म्हणून वतनी मुलखातून रक्कम जमा करण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र.
हत्तीच्या सुळावरचे शस्त्र
या तलवारीच्या पात्यावर शिकारीची दृश्ये व विविध ठिकाणी प्राणी, पर्णघट व त्रिशूळधारी देवतेच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. मुठीच्या पृष्ठभागावर बेलबुट्टीच्या नक्षीचे चांदीचे छापकाम केले आहे.