आशुतोष मसगौंडे
2014 पूर्वी अमित शाह हे नाव देशात खूप कमी लोकांना माहिती होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि अमित शाह हे नाव गाजू लागले. 2014 पासून भारतीय राजकारणात मोदी आणि शाह हे जय-वीरुची जोडी म्हणून ओळखले जातात.
कॉलेजच्या काळातही अमित शाह संघाशी जोडले गेले होते, जिथे 1982 मध्ये ते पहिल्यांदा नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी मोदी संघाचे प्रचारक होते आणि तरुणांशी संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
1995 मध्ये पहिल्यांदा भाजपने गुजरातमध्ये सरकार स्थापन केले. त्यावेळी गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद होती. त्या काळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने गावोगावी जाऊन भाजपला मजबूत केले.
मोदी आणि शहा या जोडीने गुजरातमध्ये काँग्रेसला चारी बाजूंनी कमकुवत केले. राजकीय नुकसान केल्यानंतर या दोघांनी राज्य क्रीडा समित्यांमधून काँग्रेसजनांनाही वगळण्यास सुरुवात केली.
2002 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. त्यावेळी शाह हे सर्वात तरुण मंत्री होते, ज्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती.
मोदींचा शहांवर इतका विश्वास होता की, त्या काळात त्यांनी त्यांना गृह, कायदा, कारागृह, सीमा सुरक्षा, नागरी संरक्षण अशा १२ खात्यांची जबाबदारी दिली. यानंतर शाह अनेक वादात अडकले.
2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पंतप्रधान मोदींनी अमित शाह यांनाही राष्ट्रीय राजकारणात आणले.
पुढे शहा यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यांना राज्यसभेचे खासदारही करण्यात आले. यानंतर शाह सलग दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष राहिले.