Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनचा जन्म १७ जून १९८१ रोजी क्विन्सलँडला झाला. क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉटसनचा समावेश होतो.
वॉटसनने २००२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर २०१६ साली त्याने ऑस्ट्रेलियासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्याने अनेक विक्रमही केले.
वॉटसनने २०११ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडेत नाबाद १८५ धावांची खेळी केली होती. ही त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून केलेली वनडेतील सर्वोच्च खेळी होती. हा विक्रम २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने २०१ धावा करत मोडला.
वॉटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा आणि २५० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच खेळाडू आहे. त्याच्याव्यतिरिक्त फक्त स्टीव्ह वॉ यांनी हा विक्रम केला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून वॉटसन खेळला आहे.
वॉटसन आयपीएलमध्ये ३००० हून अधिक धावा करणारा आणि ५० हून अधिक विकेट्स घेणारा दोन खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याव्यतिरिक्त फक्त पोलार्डने असा विक्रम केला आहे.
वॉटसन आयपीएलच्या एका हंगामात ४५० पेक्षा जास्त धावा आणि १५ पेक्षा अधिक विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने २००८ आयपीएलमध्ये ४७२ धावा आणि १७ विकेट्स घेतल्या होत्या.
वॉटसनने त्याच्या कारकिर्दीत कसोटीत ५९ सामन्यांत ४ शतकांसह ३७३१ धावा केल्या. तसेच ७५ विकेट्स घेतल्या.
वॉटसनने १९० वनडेत ९ शतकांसह ५७५७ धावा केल्या आहेत, तसेच १६८ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १४६२ धावा केल्या, तर ४८ विकेट्स घेतल्या.
वॉटसनने आयपीएलमध्ये १४५ सामने खेळले असून ४ शतकांसह ३८७४ धावा केल्या आहेत आणि ९२ विकेट्स घेतल्या आहेत.
वॉटसन २००७ आणि २०१५ वनडे वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. तसेच २००६ आणि २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीही त्याने ऑस्ट्रेलियाकडून जिंकली आहे.