Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानपणापासूनच त्यांची कर्तबगारी दाखवण्यास सुरूवात केली होती.
सईबाई यांच्याही विवाह झाल्यानंतर १६४२ साली शिवराय आणि जिजाबाई पुण्यात परतले होते. त्यावेळी शिवरायांचे वय १२ होते.
पुण्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर शिवरायांचे कर्तृत्व सर्वांसमोर येण्यास सुरूवात झाली.
त्यावेळी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने १२ वर्षांच्या शिवरायांनी पुणे परिसरातील १२ मावळे आपल्या वर्चस्वात आणले. त्यामुळे शिवरायांनी १२ मावळे जिंकले असंही म्हटलं जातं.
खरंतर १२ मावळांचा प्रदेश शहाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये नव्हता. त्यांच्या जाहागिरीत चाकण, सुपे, इंदापूर आणि पुणे हे परागणे होते. हे परागणे म्हणजे आजचे इंदापूर, दौंड, भीडथडी, हवेली, पुरंदर हे तालुके व भीमेच्या दक्षिणेकडील खेडचा पूर्व भाग.
शहाजी महाराजांच्या मुळच्या जहागिरीत तसे आजचे मुळशी, वेल्हे, भोर हे पुण्यातील तालुके, साताऱ्यातील वाई हे मुलूख नव्हते. पण हे मुलूख दादोजी कोंडदेव यांच्या सुभेदारीमध्ये होते. हाच प्रदेश मावळ म्हणून प्रसिद्ध होता.
दादोजी कोंडदेव या मावळ प्रदेशची व्यवस्था सुभेदार म्हणून पाहात होते.
या मुलखातील बारा मावळ म्हणजे नाणे मावळ, अंदर मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, गुंजण मावळे, कानद खोरे, पौड खोरे, मुठे खोरे, वेळवंड खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे आणि हिरडस मावळ.