Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध नुकतेच ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेत ३-० अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय संघाला ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच मायदेशात प्रतिस्पर्धी संघाने व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघ आणि मु्ख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले आहे.
गंभीरच्या प्रशिक्षणाखालील हा भारताचा पहिलाच कसोटी पराभव ठरला आहे. यापूर्वी गंभीरच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकेने भारताला ऑगस्टमध्ये वनडे मालिकेतही २-० असे पराभूत केले होते.
दरम्यान आता भारताला २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी १८ जणांचा संघही जाहीर झाला आहे. या मालिकेदरम्यान, गंभीरवरही आता दवाब असणार आहे.
यातच आता असे रिपोर्ट्स समोर आले आहेत की भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांना देखील जो विशेष अधिकार देण्यात आला नव्हता, तो गंभीरला देण्यात आला.
बीसीसीआयच्या नियमानुसार मुख्य प्रशिक्षकाला निवड समितीच्या बैठकीत कोणतीही ढवळाढवळ करण्याची परवानगी नसते.
पण गंभीरसाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेत या नियमाकडे दुर्लक्ष केले आणि गंभीर निवड समितीच्या बैठकीचा भाग बनला. याबाबत बीसीसीआयच्या सुत्राने पीटीआयला माहिती दिली.
तसेच असेही रिपोर्ट्स आहेत की गंभीरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डीला घेण्यासाठी सांगितले होते. इतकेच नाही, तर यापूर्वी हार्दिक पांड्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताचा टी२० कर्णधार करण्यातही गंभीरचे महत्त्वाचे योगदान असल्याचे समजत आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.