आशुतोष मसगौंडे
पाणी हे जीवन आहे हे आपण खूप दिवसांपासून ऐकत आलो आहोत. पण, तुम्हाला माहित आहे का की हे पाणी मेंदूसाठी टॉनिकपेक्षा कमी नाही.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, पाणी प्यायल्याने मेंदूच्या कार्याचा वेग वाढतो.
जास्त पाणी प्यायल्याने तुमची मानसिक क्षमता वाढू शकते. फ्रंटियर्स इन ह्युमन न्यूरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात पाणी आणि मेंदूच्या क्षमतेमधील संबंधांवर चर्चा करण्यात आली आहे.
अभ्यासानुसार, संज्ञानात्मक चाचणीपूर्वी सुमारे तीन कप पाणी (सुमारे 775 मिलीलीटर) प्यायलेले स्पर्धक पाणी न पिणाऱ्या स्पर्धकांपेक्षा चाचणीदरम्यान चांगले प्रदर्शन करत होते.
काजू आणि बदाम यांसारख्या पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो असे बहुतेकांना वाटते. पण मेंदूचा वेग वाढवण्यासही पाणी मदत करते, असे एरस्टन विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले.
संशोधकांच्या मते, एक ग्लास पाणी प्यायल्याने आपला मेंदू 14 टक्के वेगाने काम करू लागतो.
संशोधकांनी सांगितले की, जेव्हा तुमची तहान एका ग्लास पाण्याने शमवली जाते, तेव्हा तुमचे मन केवळ तुम्ही करत असलेल्या कामावर केंद्रित होते.
मानवी शरीरात सुमारे 60 टक्के पाणी असते. आपल्या मेंदूत 85 टक्के, रक्तात 79 टक्के आणि फुफ्फुसात 80 टक्के पाणी असते.