सकाळ डिजिटल टीम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील पराक्रमाबाबत अनेकांना माहिती असेल. त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याच्या हातावर तुरी देत ते कसे निसटले हे आपण ऐकले आहे.
या घटनेबाबत शिवकाल या पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे.
शिवाजी महाराज ११ मे १६६६ रोजी आग्र्याच्या जवळ पोहचले होते. १२ मे रोजी औरंगजेबाचा वाढदिवस होता. त्यासाठी ते शंभू राजांसह आग्र्याला गेले होते.
त्यावेळी त्यांच्या स्वागताची जबाबदारी जयसिंहाचा मुलगा रामसिंहने स्वीकारली होती, पण औरंगजेबास ते पसंत न पडल्याने त्याने त्याला दुसरं काम लावलं, त्यामुळे रामसिंहानं आपला कारकून मुन्शी गिरीधरलाला याच्याकडे ही जबाबदारी दिली.
त्यावेळी मुश्नी गिरीधरलाल याने शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या लवाजम्याचे वर्णन लिहून ठेवले. त्याने लिहिल्याप्रमाणे शिवाजी महाराजांबरोबर १०० अनुयायी होते, तर अडीचशेच्या आसपास स्वार होते. त्यातील १०० बारगीर आहेत
शिवाजी महाराज पालखीतून निघाल्यानंतर त्यांच्यापुढे पायदळ शिपायांचे पथक चालते. शिवाजी महाराज यांचा झेंडा नारंगी आणि केशरी रंगाचा आहे, ज्यावर सोनेरी आकृत्या आहेत.
महाराजांच्या लवाजम्यात उंट कमी आहेत. १०० वंजाऱ्यांचा तांडा असून प्रत्येकाकडे सामना वाहणाऱ्या बैलांची जोडी आहे. मोठे अधिकारी पालखीतून प्रवास करत असल्याने अनेक पालख्या आहेत.
गिरीधरलालचा लेखनिक परकालदासने शिवरायांना पाहून लिहिलेल्या वर्णनात आहे की त्यांचा रंग गोरा असून चेहरा सतेज आहे. त्यांना दाढी आहे, तर त्यांचा मुलगा नऊ वर्षांचा आहे, तोही गोरा आहे.
दरम्यान शिवाजी महाराज आग्र्याच्या सरहद्दीवर पोहचल्यानंतर शिरस्त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था केली नव्हती. त्यांना मुलुलचंदाची सराई या धर्मशाळेत रहावे लागले.दुसऱ्या दिवशी रामसिंहाने त्याच्या राहण्याचा हवेलीजवळच केली होती.
आग्र्यामध्ये काहीतरी मोठं मराठे करणार तर नाहीत ना अशी भीतीही अनेकांमध्ये होती. शिवाजी महाराज आग्र्यामध्ये पोहचल्यानंतर त्यांच्या पराक्रमाची आणि साहसाची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती.
शिवाय औरंगजेबानं ऐकलं होतं की शिवाजी राजे दहा-वीस हात उडी सहज मारतात. त्यामुळे घाबरून त्याने दरबारात आपल्या बसण्याच्या जागा दूर आणि उंच ठेवली होती. तसेच त्यांच्या येण्यावेळी कडेकोट संरक्षणाची व्यवस्था केली होती.
लालकिल्ल्याकडे शिवाजी महाराज जात असताना त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दीही झाली होती. शिवाजीराजे आणि शंभू राजे हे जेव्हा पोहचले तेव्हा औरंगजेब समारंभ आटोपून मंत्रगारामध्ये बसलेला होता. त्यावेळी औरंगजेब शिवाजी राजांशी एकही शब्द बोलला नव्हता.
त्यानंतर औरंगजेबाने शिवाजी महाराज आणि शंभू राजांना नजर कैदेत अडकवले. परंतु नंतर शिवाजी महाराजांनी हुशारीने आग्र्यातून पलायन केले.