सकाळ डिजिटल टीम
बौद्ध धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बौद्ध भंते यांना खास आमंत्रित करण्यात आलं होतं.
यानिमित्तानं वर्षा बंगल्यावर भगवान बुद्ध आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील प्रार्थना करण्यात आली.
यानंतर बौद्ध भंते यांना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदान करण्यात आलं.
आज आपल्यासारखे बौद्ध धम्माचे उपासक माझ्या वर्षा निवासस्थानी आल्यामुळे इथे सुखाचा 'वर्षा'व झाल्याचे मत शिंदेंनी व्यक्त केले.
जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अलौकिक समाधान मिळाल्याचेही ते म्हणाले.
जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू असली तरीही जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज आहे, असेही शिंदे म्हणाले.
राज्यातील महायुती सरकारने जिल्हा आणि तालुका स्तरावर संविधान भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे हे सरकार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे अजंठा एलोरा लेण्यांचा विकासही आम्ही करत आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना सह मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासह बौद्ध भंते उपस्थित होते.