आशुतोष मसगौंडे
खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर-पुणे महामार्गावर टोल का द्यायचा ? याचा जाब सरकारला विचारण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे पुकारलेले आंदोलन सुरू असल्याचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने किणी, तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
टोल बाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत रस्त्यावर बसून आमचे हे आंदोलन सुरूच राहील, असे सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
पुणे-कोल्हापूर हायवेच्या दुरावस्थेविरोधात तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह, विश्वजीत कमद आणि बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
"पुणे ते बंगळूरू रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. सांगली, कोल्हापुरातून पुण्यात जायला सहा ते सात तास वेळ लागतोय," असे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
आमदार विश्वजीत कदम यांनी पुढे सांगितले की, "या रस्त्याचे काम लवकर व्हावे, खड्डे असलेल्या ठिकाणी लगेच दुरुस्ती करावी आणि जोवर रस्ता पूर्ण होत नाही तोवर टोल आकारणीस आमचा विरोध असेल."
पुणे-कोल्हापूर महामार्गाची गेली अनेक दिवस दुरावस्था झाली असून या मार्गावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, असा आरोप पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केला आहे.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने खेड शिवापूर टोलनाका येथे 'टोल फ्री' आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.