Pranali Kodre
क्रिकेटची करियर म्हणून निवड करणाऱ्या अनेक पिता-पुत्रांच्या जोड्या आहेत. यामधील काही भारतीय जोड्यांबद्दल जाणून घ्या.
भारताचे दिग्गज सुनील गावसकर यांनी ३५ शतकांसह १३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यांचा मुलगा रोहन देखील भारताकडून खेळला, पण त्याला ११ वनडे सामनेच खेळता आले.
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांची तिन्ही मुलं मोहिंदर, सुरिंदर आणि रजिंदर या तिघांनीही क्रिकेटमध्ये करियर केले. त्यातही मोहिंदर अमरनाथ यांची कारकिर्द अधिक बहरली.
सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले रॉजर बिन्नी यांनी १९८३ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. त्यांचा मुलगा स्टूअर्ट हा देखील भारतीय संघासाठी खेळला.
भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने त्याच्या खेळीने अनेकांन प्रभावित केले. २००७ टी२० आणि २०११ वनडे विश्वचषक जिंकून देण्यातही त्याचा मोलाचा वाटा होता. त्याचे वडिलही क्रिकेटपटू होते, त्यांनी भारतासाठी १ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळले.
विजय मांजरेकर यांनी भारतासाठी ५५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात ७ शतकांसह ३२०८ धावा केल्या. त्यांचा मुलगा संजय मांजरेकरही भारतासाठी ३७ कसोटी आणि ७४ वनडे सामने खेळल, ज्यात त्यांनी ४ हजारांहून अधिक धावा केल्या.
टायगर पतौडी म्हणून ओळखले जाणारे मन्सूर अली खान पतौडी हे भारताच्या उत्तम कर्णधारांमध्ये गणले जातात. त्यांचे वडील इफ्तिखार हे देखील क्रिकेटपटू होते. त्यांनी इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळले.
भारताकडून खेळलेल्या दत्ता गायकवाड यांचा मुलगा अंशुमन गायकवाड यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडली. अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले होते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फलंदाजीतील अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. सर्वाधिक धावा, शतके करणाऱ्या सचिनचा मुलगा अर्जुननेही क्रिकेटची निवड केली आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मुलाची आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९वर्षांखालील मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे आता राहुल द्रविडनंतर पुन्हा एकदा भारतीय संघात द्रविड हे नाव पाहायला मिळणार आहे.