आशुतोष मसगौंडे
रिसर्चनुसार, मोबाईलच्या वापराचा थेट संबंध वाढत जाणारा लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांच्याशी आहे.
इतकंच नाही तर नैराश्य, स्किझोफ्रेनियासारखे मानसिक आजार आणि स्मृतिभ्रंशासारख्या (Dementia) गंभीर मज्जासंस्थेचा आजार, लहान मुलांमध्ये स्वमग्नता (autism, adhd) यांच्याशी जोडला जात आहे.
हे सर्व जुनाट आजार आहेत आणि म्हणूनच मोबाईलचा अतिवापर हा आरोग्याबाबतीत महत्त्वाचा विषय आहे.
सुरुवात होते ती म्हणजे मोबाईलच्या सतत वापराची सवय लागण्यापासून. मोबाईल फोनमधील सोशल मीडियामुळे आपण हळूहळू मोबाईलच्या अधीन होतो हे आपल्याला समजून येत नाही.
एका रिसर्चमध्ये हे आढळून आलं, की एक व्यक्ती साधारणपणे प्रत्येक तीन मिनिटांनी त्याचा मोबाईल तपासतो आणि मोबाईल आसपास नसेल, तर दर तीन मिनिटांनी आपल्याला बेचैनी जाणवते.
मोबाईल फोनपासून दुरावले जाण्याची भीती वाटण्याबाबतच्या आजाराला NOMOPHOBIA म्हणण्यात येत आहे आणि अशी परिस्थिती लोक अनुभवत आहेत.
याचं कारण, की सोशल मीडिया ॲप्सची अल्गोरिदमिक रचना ही मानवी मेंदूच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून बनवलेली आहे.
मेंदूला आकर्षण वाटतील असे रंग, आवाज, चित्रं इत्यादी वापरून सर्व ॲप्स बनवली जातात थोडक्यात आपलं लक्ष्य सतत त्यांच्यातच राहावं अशी त्यांची रचना आहे.