पुजा बोनकिले
दिवाळीच्या फराळातील चिवडा मुख्य पदार्थ असतो.
काही लोक दिवाळीला फक्त चिवडाच खातात.
तिखट गोड चव देणारा असा हा चिवडा कसा बनवावा हे जाणून घेऊया.
पातळ पोहे अर्धा किलो, पाव किलो शेंगदाणणे भाजून सालं काढून, १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, १०० ग्रॅम डाळ, ५० ग्रॅम काजू पाकळी, १ टे. स्पून धने, जिरे पावडर, १ टे. स्पून तीळ, ५० ग्रॅम हिरव्या मिरच्या तुकडे करून, कढीलिंब, पिठीसाखर व मीठ चवीनुसार, १ वाटी रिफाईंड तेल अथवा शेंगदाणा तेल, मोहरी, हिंग, हळद फोडणीकरता.
एका पसरट कढईत २-२ मुठी पोहे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत व एका पसरट तसराळ्यात काढावेत. दाणे भाजून सोलून घ्यावेत खोबऱ्याचे काप, मिरच्यांचे तुकडे तयार ठेवावेत.
कढईत सर्व तेल तापत ठेवावे. भाजून सोललेले दाणे मंद आचेवर तेलात तळून पोह्यांवर टाकावेत. खोबऱ्याचे काप मंद तळून पोह्यांवर टाकावेत. नंतर पोह्यांवर धने, जिरे पावडर, मीठ व पिठीसाखर चवीनुसार घालून पोहे हलवावेत.
उरलेल्या तेलात मोहरी, हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घालावा. मिरच्या तळल्या गेल्या की तीळ व डाळ टाकावे. फोडणी परतून त्यात १ टी-स्पून हळद घालावी. तयार पोहे व दाण्यांच्या मिश्रणावर फोडणी घालावी. झाऱ्याने सर्व बाजूंनी तसराळ्यात पोहे नीट ढवळून फोडणी व मीठ, साखर सर्वत्र नीट मिसळले गेले पाहिजेत. काजू घालायचे असल्यास सर्वात शेवटी घालावेत.
मिश्रण व्यवस्थित हलवून फोडणी कमी वाटलीच तर लगेच १ टे. स्पून तेलाची नुसती फोडणी करून चिवड्यावर घालून नीट ढवळावे. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरावा.
चिवड्याचे पोहे गरम फोडणीत, पातेल्यात घातले तर बरेच वेळा आवळून कडकडीत होतात. ह्या पद्धतीने चिवडा केल्यास पोहे कधीही आवळत नाहीत. फोडणीत मीठ, साखर घातले तर चिवड्यात मीठ व साखरेचे गोळे आढळतात पोह्यांवर मीठ, साखर घातल्याने एका ठिकाणी गोळे न होता सर्वत्र सारखी लागते.
पोहे अगोदर भाजल्याने चिवडा कुरकुरीत होतो. पोहे न तळल्याने तेलकट होत नाही.