पुजा बोनकिले
दिवाळीचा सण हा आनंदाचा, उत्सवाचा असतो. स्वादिष्ट, गोड फराळाचा आनंद घेण्याचा काळ असतो. जे अनेकांच्या आरोग्यासाठी आव्हानात्मक असते. मात्र योग्य नियोजन करून आपण आपल्या आरोग्याशी तडजोड न करता दिवाळीचा आनंद घेऊ शकतो.
दिवाळीदरम्यान रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी काय करावे? काय करू नये याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
रक्तातील उच्च साखरेची पातळी संतुलित ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे नियमितपणे निरीक्षण करणे. ज्यामुळे कोणते खाल्ल्यामुळे किंवा शारीरिक हालचालीमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो हे समजून घेण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली करा. फेरफटका मारा, योगाभ्यास करा किंवा तुम्हाला आवडेल अशा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा. हे केवळ तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीसाठी नाही तर आरोग्यासाठी देखील लाभदायक असेल.
मैदायुक्त पदार्थापेक्षा भरडधान्ययुक्त (ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मका) पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्याचप्रमाणे रक्तप्रवाहात शर्करा तयार होण्याचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. फराळ तयार करण्यासाठी भरड धान्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
दिवाळीत मिठाई खाण्याचा मोह होत असला तरी, ती कमीच खावी. साखरमुक्त मिठाईदेखील बाजारात मिळते. तिचा आस्वाददेखील घेता येईल. फायबर रक्तात शर्करा विरघळण्याचे प्रमाण कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. आहारात फळे, भाज्या, सुकामेवा यासारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
दिवाळीत अनेक नातेवाइकांच्या, मित्रांच्या घरी जाणे होते. त्यावेळेस फराळाचा आग्रह होणे स्वाभाविक आहे. मात्र अशावेळी फराळ मर्यादेत करा. वारंवार फराळ केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. योग्य हायड्रेशन संपूर्ण शारीरिक हालचालीस मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. मद्य रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते. यामुळे मद्यपान टाळावे.
ग्लुकोजच्या गोळ्या, फळांचा रस किंवा कँडी यासारखे गोड पदार्थ नेहमी सोबत ठेवावे.
रक्तातील साखरेची कमी पातळी नियंत्रित करण्यासाठी गोड पदार्थ नेहमी सोबत ठेवावेत. नियमित आणि वेळेवर जेवण करावे. वारंवार फराळ केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे नियमित निरीक्षण करावे असे डॉ. अपर्णा जयराम, पॅथॉलॉजिस्ट यांनी दिली आहे.