Swadesh Ghanekar
समलिंगी क्रिकेटपटू एमी जोन्स आणि पिपा क्लीरी या दोघी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकींविरुद्ध खेळल्या आहेत. जोन्स ही इंग्लंडची यष्टिरक्षक आहे, तर क्लीरी ऑस्ट्रेलियाची गोलंदाज आहे. पण, सोमवारी या दोघींनी एकमेकिंसोबत एंगेजमेंट केल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले.
एमी जोन्सने इंस्टाग्रामवर क्लीरीसोबतचा फोटो पोस्टकरून "चियर्स टू एव्हर,'' असे लिहिले. एंगेजमेंटच्या फोटोत क्लीरीच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसतेय. या दोघी बऱ्याच काळापासून डेटिंग करत होत्या.
एमी जोन्सने २०१९ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून ती महिला कसोटी आणि वन डे संघात नियमित आहे. तिने आतापर्यंत ६ कसोटी आणि ९१ वन डे सामने खेळले असून, त्यात अनुक्रमे ११६ आणि १९५१ धावा केल्या आहेत.
३१ वर्षीय जोन्सचा जन्म १३ जून १९९३ रोजी वेस्ट मिडलँड्समध्ये झाला होता. महिला बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सकडून खेळत असताना तिची पिपा क्लीरीशी भेट झाली. क्लीरी ही जोन्सपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे.
क्लीरी स्कॉर्चर्स आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया महिला यांसारख्या संघांसाठी खेळली आहे, परंतु अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाचे प्रतिनिधित्व करू शकलेली नाही. क्लीरी ही उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ६ बळी टिपून एमी जोन्स सर्वाधिक बळी टीपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक २३ Byes दिले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये एका मालिकेत सर्वाधिक २५ बळी टिपण्याचा विक्रम एमीच्या नावावर आहे.
यापूर्वी इंग्लंडची नताली साईव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांनीही लग्न केले आहे. न्यूझीलंडची एमी सैथरवेट आणि ली ताहुहू यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या मारिझॅन कॅप आणि डेन व्हॅन नीकेर यानी एकमेकिंशी लग्न केलं आहे.
ऑस्ट्रेलियाची जलदगती गोलंदाज मीगन शट, फिरकीपटू जीस जोनासेन यांचाही या यादीत समावेश आहे.