Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत 11 वा सामना एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यात लखनौने 21 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यातून आयपीएल पदार्पण करणारा लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने त्याच्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.
त्याने आयपीएल 2024 हंगामातील सर्वात वेगवान ताशी 155.8 किमी वेगाने चेंडूही टाकला. त्याने हा चेंडू पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनच्या विरुद्ध टाकला. हा चेंडू आयपीएल इतिहासातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात वेगवान चेंडू ठरला.
आयपीएल मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे. त्याने 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध खेळताना ताशी 157.71 किमी वेगाचा एक चेंडू टाकला होता.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर लॉकी फर्ग्युसन आहे. त्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ताशी 157.3 किमी वेगाचा चेंडू टाकला होता.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय गोलंदाज उमरान मलिक आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2022 मध्ये ताशी 157 किमी वेगाने चेंडू टाकला होता.
चौथ्या क्रमांकावर एन्रिच नॉर्किया आहे. नॉर्कियाने दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध 2020 आयपीएलमध्ये ताशी 156.22 किमी वेगाने चेंडू टाकला होता.