सकाळ डिजिटल टीम
Hupari Silver Jewelry : शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या येथील चांदी दागिने हस्तकला उद्योगाला ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले आहे.
हुपरीतील चांदी उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चांदी कारखानदार असोसिएशन, चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन आदी संस्थांनी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आलंय.
कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ, कोल्हापुरी चप्पलनंतर (Kolhapuri Chappal) आता हुपरीच्या चांदी (Hupari Silver) दागिने हस्तकला उद्योगास हा बहुमान प्राप्त झालाय.
हुपरीतील चांदी हस्तकला उद्योग व्यवसाय शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे.
शंभर वर्षांपूर्वी हुपरीतील एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला हा हस्तकला व्यवसाय आजघडीला आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावांत पसरलेला आहे.
सध्या चाळीस हजारांवर कारागीर चांदी दागिने निर्मितीचे काम करतात.
हस्तकलेवर तयार होणाऱ्या अत्यंत सुबक व नक्षीदार कलाकुसरीच्या दागिन्यांनी देश-विदेशातील बाजारपेठ काबीज केलेली आहे.
महिलावर्गात अढळ स्थान प्राप्त केलेल्या ‘पैंजण’ या दागिन्यांची बाजारपेठेत मोठी क्रेझ आहे. याबरोबरच करदोरे, वाळे, तोडे, जोडवी, मासोळ्या, वेडण्या, बिछवा आदी विविध प्रकारच्या दागिन्यांची निर्मिती येथे होते.