ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
१५ ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन. प्रत्येक देशवासीयांसाठी हा अभिमानाचा दिवस.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी आपल्या शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेत खूप छान पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा व्हायचा. सकाळी लवकर उठून स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून शाळेत जाणे. लेझिमचा कार्यक्रम, परेड अशा स्वातंत्र्यदिनाच्या अशा खूप छान आठवणी होत्या.
मला १५ ऑगस्टला दरवर्षी शाळेच्या असेम्ब्लीमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीत सहभाग घ्यायला सांगायचे. कधी देशभक्तिपर गाणं असेल, नृत्य असेल किंवा स्टँडअप कॉमेडी असेल. शाळेत खूप शिस्त पाळावी लागायची. अनेक आठवणी माझ्या मनात आजही घर करून आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही सकाळी लवकर उठून शाळेत जायचो. ध्वजवंदन करायचो. त्यानंतर समूहगीत गायन, देशभक्तिपर गाणी तसेच नृत्यविष्कारासारखे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. मी दरवर्षी हा दिवस शाळेत जाऊन एन्जॉय केला आहे. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा!
स्वातंत्र्यदिनाच्या खूप आठवणी आहेत. माझ्या लहानपणी घरोघरी टेपरेकॉर्डर आणि कॅसेट असायचे आणि प्रत्येक घरात देशभक्तिपर गाणी लागायची. दोन दिवस आधीपासून आम्ही या दिवसाची वाट बघायचो. सकाळी ६.४५ वाजता आमच्या गावात प्रभातफेरी निघायची. एकूणच आनंददायी असा अनुभव असायचा...
मला आठवतंय एकदा आम्ही केलेल्या स्किटमध्ये मी भगतसिंग झाले होते. ती आठवण कायमच माझ्या मनात राहील. त्या दिवशी शाळा साडेनऊ वाजेपर्यंतच असायची. मग दिवसभर सुट्टी. लहानपणी त्या सुटीची मज्जा काहीतरी वेगळीच असायची. त्या सुटीची मी खूप मजा घेतली. झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले की मी आणि माझे मित्र-मैत्रिणी फिरायला जायचो.