Pranali Kodre
न्यूझीलंड क्रिकेट संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध झालेला तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी २५ धावांनी विजय मिळवला.
या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकत भारताला व्हाईटवॉश दिला.
या मालिकेत न्यूझीलंडचा फलंदाज विल यंग मालिकावीर ठरला. विल यंग या मालिकेत दुखापतग्रस्त केन विलियम्सनच्या जागेवर खेळला होता.
या मालिकेत विल यंगने खूप मोठी खेळी केली नाही, परंतु त्याने प्रत्येक सामन्यात प्रभाव पाडणारी खेळी केली.
पहिल्या विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या विल यंगने प्रत्येकवेळी डाव सावरणारी खेळी केली आणि संघाला स्थिरता दिली.
विल यंगने बंगळुरूला झालेल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात ३३ धावा केल्या आणि डेव्हॉन कॉनवेसोबत ७५ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात नाबाद ४८ धावांची खेळी करताना रचिन रविंद्रसोबत नाबाद ७५ धावांची खेळी केली.
पुण्यात झालेल्या दुसर्या कसोटीत त्याने पहिल्या डावात १८ धावा करताना कॉनवेसोबत ४४ धावांची भागीदारी केली. तसेच दुसऱ्या डावात २३ धावा करत टॉम लॅथमसोबत ४२ धावांची भागीदारी केली.
मुंबई कसोटीत विल यंगने ७१ आणि ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्याने पहिल्या डावात लॅथमसोबत ४४ आणि डॅरिल मिचेलसोबत ८७ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात त्याने कॉनवेसोबत ३७ धावांची आणि मिचेलसोबत ५० धावांची भागीदारी केली.