Pranali Kodre
भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीने 6 जून 2024 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील कुवेतविरुद्धच्या सामना त्याचा शेवटचा सामना ठरला.
साल 2005 मध्ये सुनील छेत्रीने भारतासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर गेल्या 19 वर्षात त्याने 151 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 94 गोल केले. तो 88 सामने कर्णधार म्हणून खेळलाय.
सुनीलची खेळांशी ओळख लहानपणीच झाली होती. त्याचे आर्मीमध्ये असलेले वडील फुटबॉल खेळायचे आणि आई देखील नेपाळच्या राष्ट्रीय संघाकडून फुटबॉल खेळली आहे.
सुनील लहानपणापासून वेगवेगळे खेळ खेळायचा. त्यावेळी तो प्रत्येक खेळात आईला हरवण्याचा प्रयत्न करायचा. त्याची आईही त्याला सहजासहजी जिंकू द्यायची नाही. त्यामुळे खेळातल्या स्पर्धेशी त्याची लहानपणीच ओळख झाली.
मात्र, तो आवड म्हणून फुटबॉल खेळायचा, कधी प्रोफेशन म्हणून त्याने विचार केला नव्हता. पण 2001-2002 दरम्यान त्याला दिल्लीतील सिटी क्लबने संधी दिली.
नंतर मोहन बगानने त्याची निवड झाली अन् त्याचं खऱ्याखुऱ्या प्रोफेशनल फुटबॉलमध्ये आगमन झालं, तिथे सध्या त्याचे सासरे असलेले सुब्रतो भट्टाचार्य तेव्हा प्रशिक्षक होते. तिथून त्याला फुटबॉलचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळालं.
पुढे जाऊन छेत्री इस्ट बंगाल, डेम्पो क्लब, चिराग युनायटेड, कानसास सिटी विझार्ड, स्पोर्टिंग सीपीबी, चर्चिल ब्रदर्स, बेंगळुरु एफसी, मुंबई सिटी एफसी अशा अनेक क्लबकडूनही खेळला आहे.
पुढे बायचुंग भूतियाचा वारसदार समजल्या जाणाऱ्या छेत्रीने स्वत:ची वेगळी ओळख बनवली आणि त्याच्या कारकिर्दीची अखेर भारतीय फुटबॉलमधील दिग्गज म्हणून केली.