सकाळ डिजिटल टीम
देशात नावलौकिक असलेला बेळगावमधील किल्ला तलावाच्या आवारातील सर्वात उंच राष्ट्रध्वज पुन्हा उतरविण्यात आला आहे.
जोरदार वाऱ्यामुळे राष्ट्रध्वजाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यावर तो उतरविण्याची सूचना ठेकेदाराला दिली.
नवा राष्ट्रध्वज पुन्हा फडकविलेला नाही. राष्ट्रध्वज पुन्हा कधी फडकणार? याबाबतची नेमकी माहिती महापालिकेकडे नाही.
प्रजासत्ताक दिनी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविला होता.
पावसाळ्यातील चार महिने वगळता अन्य आठ महिने राष्ट्रध्वज फडकत राहिला पाहिजे, अशी सूचना आमदार सेठ यांनी महापालिकेला दिली होती.
महापालिकेने संबंधित ठेकेदाराला राष्ट्रध्वज नियमित फडकत राहावा, अशी सूचना दिली होती. त्यानुसार सलग ५२ दिवस राष्ट्रध्वज फडकत राहिला.
मात्र, आता दोन महिने पूर्ण होण्याआधीच पुन्हा राष्ट्रध्वज उतरविला आहे. राष्ट्रध्वजाचे नुकसान झाल्यास नवा ध्वज आणणे व तो फडकविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे.