Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची असून ही मालिका २२ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये १० आणि ११ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.
भारताच्या दुसऱ्या तुकडीसह ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.
यावेळी त्याने अनेक मुद्यांवर स्पष्ट उत्तरं दिली. त्याने रोहित शर्माच्या रिप्लेसमेंटबद्दलही स्पष्ट मत मांडलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या एक किंवा दोन सामन्यांसाठी भारताचा कर्णधार उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे.
रोहित लवकरच दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. त्यामुळे रोहित काही दिवस पालकत्व रजा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्याप तो ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला नाही.
अशात रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जर काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, तर त्याच्याऐवजी उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचेही गौतम गंभीरने स्पष्ट केले आहे.
तसेच रोहितच्या अनुपस्थितीत अभिमन्यू ईश्वरन किंवा केएल राहुलचा सलामीला फलंदाजीसाठी विचार होऊ शकतो, असेही गंभीरने स्पष्ट केले.