Saisimran Ghashi
मुंबईकरांची आज सकाळपासूनच चांगली त्रेधा उडाली.
मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अचानक रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरण्यास थोडा वेळ लागला कारण... नेटवर्कच गायब होते!
लोकांना लाडक्या बाप्पाबरोबरच्या स्टोरी टाकायच्या होत्या, पालकांना सकुशल पोहोचल्याची माहिती द्यायची होती, पण अडथळा ठरला तो जिओ नेटवर्कचा.
वाहतूक कोंडीमुळे विसर्जनाच्या दिवशी वर्क फ्रॉम होम काम करण्याची सोय मिळालेल्या अनेकांना ज्यांच्या घरी वाय-फाय फायबरचाच आहे त्यांना नेटवर्क डाऊनचा जास्त त्रास झाला
या नेटवर्क डाऊनच्या मागील खरे कारण आता समोर आलेले आहे.
जिओच्या डेटा सेंटरमध्ये आग लागल्या कारणाने 2-3 तास मुंबई आणि महानगरातील जिओ नेटवर्कची सेवा ठप्प झाली होती.
मुंबईमध्ये दहा हजारांहून अधिक युजर्सनी नेटवर्क न मिळाल्याची तक्रार केली.
जिओच्या या नेटवर्क डाऊनमुळे मुंबईकरांना झालेला त्रास आणि सोशल मीडियावर झालेले ट्रॉलिंग मात्र चर्चेचा विषय बनलेले आहे.