Pranali Kodre
जो रुट कसोटीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. त्याने नुकतेच पाकिस्तानविरुद्ध ७ ऑक्टोबरपासून मुलतानला चालू झालेल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे.
जो रुटचे कसोटीतील हे ३५ वे शतक ठरले आहे. तसेच त्याने कसोटीत १२५०० धावांचा टप्पाही पार केला आहे.
इतकेच नाही, तर रुटने २०२४ वर्षात कसोटीमध्ये १००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत.
रुटने कसोटीमध्ये एका वर्षात १००० धावा पूर्ण करण्याची ही पाचवी वेळ आहे. त्याने २०१५, २०१६, २०२१, २०२२ आणि २०२४ असे पाच वर्षी कसोटीत १००० धावा केल्या आहेत.
सध्याच्या काळातील फॅब फोरमध्ये विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि जो रुट यांना म्हटले जाते. हे चौघेही समवयस्क खेळाडू असून त्यांनी जवळपास एकाच वेळी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
मात्र, सध्या असं दिसतंय कसोटीत तरी रुट अन्य तिघांपेक्षा खूप पुढे चालला आहे. विराटच्या कसोटीत ८९४७ धावा (२९ शतके) आहेत, स्मिथच्या ९६८५ धावा (३२ शतके) आहेत, तर विलियम्सनच्या ८८८१ धावा (३२ शतके) आहेत.
तसेच स्मिथने २०१४, २०१५, २०१६ आणि २०१७ या सलग चार वर्षी कसोटीत १००० धावा पार केल्या होत्या. विराटने २०१६, २०१७ आणि २०१८ असे तीन वर्षे १००० कसोटी धावा केल्या होत्या. विलिम्सननने २०१५ मध्ये १००० कसोटी धावा केल्या होत्या.
एकूणच २०१९ पासून विराट, स्मिथ आणि विलियम्सन यांच्यापैकी कोणालाही कसोटीत एका वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही, पण दुसरीकडे रुटने २०१९ नंतर तीन वर्षी कसोटीत १००० धावा केल्या आहेत.