सकाळ डिजिटल टीम
भारतातील असंख्य मंदिरांमध्ये स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरसुद्धा अशाच स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचे (Khidrapur Kopeshwar Temple) काम इ. स. पूर्व 600 शतकात चालू झाले असावे, असे इथले ताम्रपट सांगतात.
जसजशा राजवटी बदलत गेल्या तसतसे त्या मंदिरात संस्कार घडत गेले म्हणूनच कधी जैन, बौद्ध (Buddhist), हिंदू अशा तीनही धर्माच्या मूर्ती, व्यक्तिमत्त्वे इथे दिसतात.
सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, आदिलशहा अशा राजवटींनी या मंदिरावर संस्कार केलेले दिसून येतात. आज मंदिराला 1600 वर्षे झाली. कृष्णा नदीकाठी वसलेल्या या कोपेश्वर मंदिरात महादेव म्हणजेच शंकर आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते.
कोपेश्वर मंदिरात एकूण 108 खांब आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला स्वर्गमंडप. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे इथे शिवलिंगासमोर नंदी नाही. हा नंदी खिद्रापूरपासून जवळपास 12 किमी दूर कर्नाटकातील यडूर गावी आहे. तिथं फक्त नंदीचं मंदिर आहे.
या मंदिराला लागणारा काळा दगड कुठून आणला, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, हा दगड तिथे आजूबाजूला कुठेच नाही. बहुतेक तो कोकणच्या सह्याद्री पट्ट्यातून नेला असावा, असा संशोधक अंदाज वर्तवतात.
या मंदिराच्या बाजूला एक जैन मंदिर आहे. ते मुद्दामहून चौकशी करून बघायला जा. तेथील मूर्ती १५ ते १६ फूट आहे. त्याचा दगड सकाळ, दुपार, संध्याकाळ आपला रंग बदलतो. आजूबाजूला धर्मांतरित मुस्लिम, जैन, बुद्ध आणि मुळ हिंदू अशी लोकसंख्या बघायला मिळते.